अहमदनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २२ मार्च रोजी जनता कर्फ्युचे आवाहन केले होते. या दिवशी सायंकाळी पाच वाजता टाळ्या, थाळ्या वाजवून कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तुमच्या-आमच्या सुरक्षेसाठी जीवाची पर्वा न करता काम करणाऱ्या घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. साईबाबांच्या शिर्डीतील सर्व ग्रामस्थांनी आपापल्या घरात साई स्तवन मंजिरी पठण व घंटानाद करुन कोरोना विषाणूचा जगभरातून नायनाट होण्याची प्रार्थना केली.
जगभरात थैमान घालणारा कोरोना विषाणू देशातून नव्हे तर, जगातून नष्ट व्हावा, यासाठी आज शिर्डीकरांनी प्रार्थना केली. सायंकाळी साडेचार वाजता आपापल्या घरी कुटुंबासमवेत साईस्तवन मंजिरीचे पठण करण्यात आले. यानंतर पाच वाजता सर्वांनी घराबाहेर येवून साईनामाचा जयजयकार करत टाळ्या, थाळ्या, शंख, घंटा वाजवल्या.
साईबाबा संस्थानच्या स्पीकरवरून ठीक साडेचार वाजता साई स्तवनमंजिरीची रेकॉर्ड वाजवण्यात आली. तसेच, पाच वाजता साई मंदिरात घंटानाद करण्यात आला. एकाच वेळी साई मंदिर आणि मंदिर परिसरातील हनुमान मंदिर तसेच, अन्य मंदिरांत पुजाऱ्यांनी पाच मिनिटे घंटानाद केला.
हेही वाचा - 'माझं कोणीही नाही, उपासमारीची वेळ आलीय...', कोरोनामुळे नागरिकाची अशीही कैफियत
हेही वाचा - महाराष्ट्र लॉकडाऊन..! कलम १४४ लागू, ३१ मार्चपर्यंत अत्यावश्यक सोडून सर्व सेवा बंद