अहमदनगर - 'आजके शिवाजी महाराज नरेंद्र मोदी' या वादग्रस्त पुस्तकाचा अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी शहरातील जुने बसस्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला. आंदोलन स्थळी भाजप आणि वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर जगाचे महान राजे होते. त्यांचा आदर्श आणि सन्मान खूप मोठा आहे. त्याची तुलना कुणाही एका व्यक्ती बरोबर होऊ शकत नाही. असे असताना एका भाजपच्या लेखकाने छत्रपतींची तुलना नरेन्द्र मोदी यांच्या सोबत करून करोडो शिवप्रेमींचा अपमान केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी केला. यावेळी पुस्तकाचा निषेध करत भाजप आणि वादग्रस्त पुस्तक लेखकाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.