शिर्डी - विखे, थोरात यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असताना श्रीरामपूर येथील प्रचार कार्यालयाच्या मुख्य बोर्डवर त्यांना स्थान देण्यात आले नाही. सोनिया गांधी ते बाळासाहेब थोरात आणि थोरातांचे मेहुणे आमदार सुधीर तांबे यांचा फोटो देखील बोर्डवर छापण्यात आला आहे. जाणुन बूजून विखे पाटलांचा फोटो का डावलला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महत्वाची बाब म्हणजे श्रीरामपूर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरांत यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रेसचे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे हे विखे समर्थक मानले जातात. मात्र, कांबळेंनी बाळासाहेब थोरातांची मदत घेतल्याने विखे-पाटील हे कांबळेपासून दूर आहेत. विखे-पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर, दुसरीकडे विखे पुत्र सुजय विखे भाजपत गेल्यानंतर विखे पाटलांच्या काँग्रेस निष्ठेवर थोरातांनी हल्लाबोल केला आहे.
सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाने राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत आले आहेत. विखेंपेक्षा मोठे होण्याची संधी यामुळे थोरातांकडे आली आहे. थोरातांनी सर्व प्रचार यंत्रणा कांबळे यांच्या पाठीशी उभी केली आहे. सर्व सुत्रे थोरात यांच्या यंत्रणेने हातात घेतली आहे. थोरात यांनी फायदा उचलत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना एकत्र करत थोरातांनी विखे पाटील यांच्या विरोधकांची मोट बांधली आहे. विखे, थोरात यांच्या संघर्षात आता पक्षाचे भले होत की अधोगती, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.