अहमदनगर - साईबाबांची शिर्डी नेहमी गर्दीने फुललेली पाहात असतो, मात्र आज चक्क रंगीबेरंगी फुलांनी सजलेली पाहायला मिळाली आहे. शिर्डी साईबाबांच्या मंदिराच्या एक नंबर गेट समोरील रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर कागदी फुलांच्या वेलींनी फुलांची मैफील सजवली आहे. रंगीबेरंगी फुलांनी निसर्गाचे रंग सामावून घेत या वेलींचे सौंदर्य बहरून आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, असे असताना निसर्गाची श्रीमंती सर्वांना आकर्षित करत आहे. लॉकडाऊनमध्ये बाहेर जाऊन निसर्गाच सौंदर्य डोळ्यांनी अनुभवता येण सध्या शक्य नाही. मात्र, साईबाबा मंदिराच्या एक नंबर गेट समोरील नगर-मनमाड महामार्गच्या मधोमध दुभाजकावरील झाडांना रंगीबेरंगी फुलं आली असून ती सर्वांचे मन मोहून घेत आहे.
लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात घटल्याने प्रदुषण कमी झाले आहे. वाहनांचा काळवट धूर ओसरल्याने रस्त्यांवरील कागदी फुलांच्या वेलींना बहर आलाय. सहजासहजी ही फुले गळुन पडतात किंवा वाहनांच्या धुरामुळे कोमेजून जातात. मात्र, लॉकडाऊच्या काळात या रंगीबेरंगी फुलांचे सौंदर्य आता अगदी रंगाची उधळण करू लागले आहे.