अहमदनगर - एकत्र या, तुकड्यातुकड्या काम करू नका, सामूहिक प्रयत्न हाच कोरोनावर उपचार आहे. आम्ही काही वेगळे केले नाही, फक्त एकजुटीने प्रामाणिक प्रयत्न केले आणि गाव कोरोनामुक्त झाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यासाठीच आमचे कौतुक करत आहेत, अशी प्रतिक्रिया आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी दिली.
हेही वाचा - मे महिन्यात नगर जिल्ह्यात ९ हजार ९२८ बाल कोरोना रुग्ण; जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
नियम पाळून गावगाडा सुरू
राज्यातच नव्हे तर देशात आदर्शग्राम म्हणून ओळख असलेल्या हिवरेबाजार गावाला गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाने ग्रासले होते. मात्र, आदर्शग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे शास्त्रशुद्ध नियोजन आणि गावकऱ्यांनी केलेली प्रामाणिक अमलबाजवणीमुळे आता हिवरेबाजार कोरोनामुक्त झाले आहे. सध्या गावात एकही कोरोना रुग्ण नसले तरी सर्व कोरोनाचे नियन पळून गावगाडा सुरू आहे.
..आणि हिवरेबाजार झाले कोरोनामुक्त
गेल्या काही दिवसांत पन्नासच्यावर ग्रामस्थ कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. आता हे सर्व रुग्ण बरे झाले असून पंधरा मे रोजी हिवरेबाजार शंभर टक्के कोरोनामुक्त झाले, असे पोपटराव पवार यांनी सांगितले. कोरोनाचा रुग्ण आढळताच पवार यांनी ग्राम सुरक्षा समिती आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत नियोजन केले. आरोग्य यंत्रणा, ग्रामसुरक्षा समिती, ग्रामपंचायत, कार्यकारी समित्या यांची चार पथके तयार केली. या पथकांनी गावातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली तर ग्राम सुरक्षा कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना कडक नियम पाळण्यासाठी आवाहन करत बाधितांचे अलगीकरण, त्यांना सेवा-सुविधा दिल्या. इतर ग्रामस्थांनी आवाहन केलेले नियम प्रामाणिकपणे पाळल्याने गाव शंभर टक्के कोरोना मुक्त झाले.
पोपटरावांनी केले व्हीसी'द्वारे सरपंचांना मार्गदर्शन
हिवरेबाजारने अवलंबलेला कोरोनामुक्तीचा उपक्रम राज्याला आदर्शवत असाच आहे. याबाबत पवार यांनी नगर जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिवरेबाजारने राबवलेली कोरोनामुक्तीची सुत्री सांगितली. साथरोगात प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेबरोबरच स्वयंशिस्तीला सर्वात मोठे महत्व असते. नागरिकांचा प्रामाणिक सहभाग नसेल तर यंत्रणा हतबल ठरतात आणि साथरोग आटोक्यात येत नाही. त्यामुळे, गावागावांतील स्थानिक राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत उपाययोजना आखणे आणि त्याचे नागरिकांकडून पालन करून घेणे आणि त्यात नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्यास कोणताही साथरोग आटोक्यात येतो, हा साधा फॉर्म्युला असून तो प्रामाणिकपणे पाळावा, असे आवाहन पोपटराव पवार यांनी ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि नागरिकांना केले.
हेही वाचा - मोदींनी जाहीर केलेल्या योजनांमुळे अनाथ मुलांचे भविष्य घडेल - विखे पाटील