अहमदनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाची महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यात रविवारी २५ ऑगस्टला येत आहे. प्रथमच सलग दोन दिवस मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात असणार आहेत. २५ ऑगस्टला यात्रा जिल्ह्यातील अकोले तालुक्यांत प्रवेश करेल.उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी आणि सायंकाळी दक्षिण नगरमधील अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री सभा घेनार आहे.
सोमवारी 26 ऑगस्टला यात्रा पाथर्डी, बीड जिल्ह्यातील आष्टी त्यानंतर पुन्हा नगर जिल्ह्यातील जामखेड याठिकाणी दाखल होणार आहे. याठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आलेला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, खासदार सुजय विखे यांच्या उपस्थितीमध्ये बुधवारी यात्रेच्या तयारी संदर्भात जिल्ह्यातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राम शिंदे यांनी फक्त नगर जिल्ह्यात ही यात्रा दोन दिवस थांबणार असल्याचे विशेष नमूद केले. बुधवारी झालेल्या भाजपच्या बैठकीत पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार-खासदार, तालुका अध्यक्ष जिल्हा कार्यकारणी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यामधील अकोले, राहाता, राहुरी, नगर या जागा शिवसेनेकडे असताना याठिकाणीही मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार असल्याने याविषयी शिवसेनेची भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अकोल्यात आमदार वैभव पिचड, राहात्या मध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाकडून अंतिम समजली जात आहे. त्यामुळे या जागा शिवसेना भारतीय जनता पक्षाला सोडणार का, किंवा त्या बदल्यामध्ये इतर कोणत्या जागा मागणार याबद्दलही उत्सुकता असणार आहे.