अहमदनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सोमवारपासून नगर जिल्ह्यातून सुरुवात होत आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे ही यात्रा गेली २ दिवस स्थगित करण्यात आली होती. मात्र, यात्रा घेण्यात येत असली तरी उत्तर नगरमधील ४ सभा मुख्यमंत्र्यांनी रद्द केल्या आहेत. शिवाय आज राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा देखील नगरमध्ये येणार आहे.
राधाकृष्ण विखे यांच्या मातोश्री आणि बाळासाहेब विखे यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे मुख्यमंत्री लोणी येथे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या निवासस्थानी जाऊन विखे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने दक्षिण नगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे जाणार आहे. या ठिकाणापासून महाजनादेश यात्रेस पुन्हा सुरुवात होत आहे. पाथर्डी येथे दुपारी १२ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री बीड जिल्ह्यातील आष्टी येथे जाणार आहेत. त्याठिकाणी देखील सभा घेण्यात येणार आहेत. आष्टी येथील सभा संपल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास मुख्यमंत्री नगर जिल्ह्यातील जामखेड येथे जाणार आहेत. याठिकाणी राऊत पटांगणामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री पुढे बीड जिल्ह्यात जातील. आजचा एकंदरीत दौरा पाहता पाथर्डी येथे आमदार मोनिका राजळे, तर जामखेड येथे राम शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज जामखेडमध्ये -
राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा बीड जिल्ह्यातून आज पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात येणार आहे. शिवस्वराज्य यात्रा दुपारी ४ वाजताच जामखेड येथे येणार आहे. अमोल कोल्हे, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये येथे एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आज दुपारी ४ वाजता भाजपची महाजनादेश यात्रा, तर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा जामखेडमध्ये एकाच वेळी असल्याने दोन्ही बाजूने मोठे शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने या दृष्टीने जामखेडमध्ये पूर्ण तयारी केलेली आहे.