अहमदनगर- कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. बाजारातून पर्यावरणपूरक गणेश मुर्ती घेण्याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसतोय. शिर्डीतील ग्रीन अँड क्लीन शिर्डी या ग्रुपच्यावतीने यंदा गाईचे शेण आणि मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी आणल्या आहेत. ना नफा ना तोटा या तत्वावर गणेश भक्तांना मूर्ती विक्री करणे सुरु आहे.
निसर्गाचे रक्षण करणे तसेच नागरिकांची ही काळजी घेण्यासाठी ग्रीन आणि क्लीन शिर्डीच्या वतीने गाईचे शेण आणि मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्ती बाजारात विक्रीसाठी आणल्या आहेत. गायीचे शेण आणि मातीपासून बनवलेल्या या इकोफ्रेंडली मूर्ती दिसण्यास अतिशय आकर्षक असून यातून पर्यावरणाचे रक्षणाचा प्रयत्न ग्रीन आणि क्लीन शिर्डी यांच्याकडून करण्यात येत आहे.
गाईचे शेण आणि माती पासून बनवलेला मूर्तीची विक्री करुन निसर्गाचे रक्षण करण्याचा प्रयत्न असल्याचे मूर्ती विक्रेते अजित पारख यांनी सांगतिले. ना नफा ना तोटा तत्वावर खरेदी केलेल्या भावात गणेश भक्तांना विक्री करत आहोत, असे पारख म्हणाले आहेत. बहुतांश मुर्तिकार प्लास्टर ऑफ पॅरिस पासून मूर्ती तयार करतात. या मूर्ती सहजपणे पाण्यात विरघळत नाहीत. त्यामुळे नदी, तलाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, तरीही शिर्डी शहरातील अनेक भागात पीओपी आणि शाडू मातीच्या गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. शहरात पाहिल्यादांच गाईचे शेण आणि माती पासून बनवलेल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी आल्या असल्याने नागरिकांनी या मूर्ती पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी मोठी गर्दी केली, अजित पारख यांनी म्हटले.
पीओपीच्या चककीत मुर्तीचे रुप मनाला मोहक वाटत असले तरी ती पाण्यात विसर्जित केल्याने मोठी हानी होते. अनेक वेळा नदी आणि विर्सजन स्थळी या मुर्तींचे अवशेष दिसून येतात, असे दीपक वाघ या गणेश भक्ताने सांगितले. माती आणि शेणाच्या या मूर्ती आपण घरातच बादली मध्ये विसर्जित करुन ते पाणी झाडांना टाकू शकतो. यामुळे गणपती बाप्पांचा सहवास कायम आपल्याला लाभेल, अशा भावना दीपक वाघ यांनी व्यक्त केली.
शिर्डीतील ग्रीन आणि क्लीन शिर्डी या ग्रुपच्यावतीने शिर्डी शहरात वृक्षरोपण, स्वच्छता असे अनेक उपक्रम राबवले जातात. यावर्षी ग्रुपने कलाकारांकडून या मूर्ती बनवून घेतल्या असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे.पीओपी तसेच शाडू मातीच्या गणेश मूर्ती पेक्षा अल्प दारात शेण मातीच्या मूर्ती मिळत आहेत. या मूर्तींमुळे निसर्गाची कोणतीही हानी होणार नसल्याने गणेश भक्त देखील या मुर्ती घेण्यास प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून आले.