अहमदनगर- राहाता शहरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी, या मागणीसठी शहरातील नागरिकांनी राहाता पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. या प्रकरणाची चौकशी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात यावी, असी मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विकृत मनोवृत्तीच्या आरोपीच्या कृत्याचा नागरिकांनी निषेध केला. या घटनेतील आरोपीचे मनोबल उंचावू नये यासाठी त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी मांडले.
आरोपी अनिल किसन थोरात विकृत प्रवृत्तीचा असून याअगोदर त्याने विद्यालयातील अनेक विद्यार्थिनींना व महिलांना त्रास दिला आहे. तो वेळोवेळी महिलांना त्रास देतो. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना पाठवलेल्या निवेदनात नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.