अहमदनगर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे देशाच्या विकासाच्या गप्पांचा फड राजकीय नेते रंगवित आहेत. तर, दुसरीकडे मात्र पिण्याच्या पाण्यासाठी लोकांचे हाल सुरु आहेत. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील अनेक गावातील लोक दिवसभर मोलमजुरीसाठी गाव सोडून बाहेरगावी जातात. मात्र, पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत नसल्याने एप्रिलमध्येच सुर्यदेव डोक्यावर आग ओतू लागले आहे. जमिनीतील पाणीदेखील आटले आहे.
पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ महिलांसोबत कुटुंबीयांवर आली. हंडाभर पाणी मिळविण्यासाठी भली मोठी रांग लावायची आणि तांब्याने एका झऱ्यातून पाणी काढत तहान भागवायची, असे चित्र सध्या संगमनेरच्या पठार भागातील हिवरगाव पठारच्या पायरवाडीमध्ये अनुभवण्यास मिळत आहे.
उन्हाळ्यात निर्माण झालेल्या दुष्काळामुळे गावातील विहिरीचे पाणी आटले आहे. आता या वाडीत आठवड्यातून एकदा पाण्याचा टँकर येतो. दोनशे लोकवस्तीच्या गावाला आठवडाभर या टँकरचे पाणी पूरत नाही. हंडाभर पाण्याची सोय करण्यासाठी वाडीतील कुटुंबे पहाटेच जागी होतात. पाण्यासाठी लहान मुलांना आपली शाळादेखील बुडवावी लागते. घरातील कर्त्या माणसांच्या अनुपस्थितीत घरात या दरीतून पाणी आणण्याची कसरत ते पार पाडत असतात. मायबाप सरकार निवडणुकीत व्यग्र असताना या गावातील लोकांना मतापेक्षा पाण्याची चिंता अधिक भेडसावत असल्याचे दिसले आहे.
संगमनेरच्या तळेगाव आणि पठार भागाच्या तर पाचवीला दुष्काळ पुजलेला. दुष्काळाच्या झळा सर्वप्रथम या भागाला लागतात. काही ठिकाणी तर वर्षभर पाण्याचे टँकर पुरवावे लागते. दुष्काळात पाणी योजनादेखील माना टाकतात. आणि टँकरने पाणी देण्याची वेळ प्रशासनावर येते. लोकसंख्या विचारात घेऊन टँकरने पाणी पुरविण्याचा निर्णय प्रशासन घेते आणि टँकरने पाणीदेखील देण्याचा प्रयत्न होते. मात्र, गळके टँकर आणि निर्धारीत ठिकाणी पोहचेपर्यत पाणी पातळी खाली गेलेल्या टँकरमधून पाणी मिळणे म्हणजे डोंगर फोडून उंदीर काढण्यासारखा प्रकार. आलेल्या टँकरमधून पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांची एकच झुंबड बघायला मिळते.
संगमनेरच्या अनेक वाड्यावस्त्यांवर हे चित्र सध्या दिसत यंदा दुष्काळामुळे माणसांबरोबर जनावरांना पिण्याला पाणी भेटने मुश्कील झाले आहे. हाताला काम नसल्याने पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात जाण्यासाठी सकाळी नऊ वाजता घरातून बाहेर पडावे लागत आहे. संध्याकाळी सात वाजता घरी यायला. हंडाभर पाण्यासाठी पहाटे पासून झऱ्यावर बसावे लगत असल्याने आजही पाण्यासाठी वनवण करावी लागत आहे.