शिर्डी - कोविड संकटाच्या काळात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून चांगले काम करत, साईबाबांच्या आरोग्य सेवेचा वारसा समर्थपणे सुरू ठेवल्याबद्दल साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांचा शिर्डीतील ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. दरम्यान शिर्डी ग्रामस्थांनी साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कोविड ऐवजी इतर रुग्णांवर उपचार करण्याची केलेली मागणी मान्य करण्यात आली असल्याची माहीती शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी दिली.
कोविड संकटाच्या काळात साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा लाभ हजारो गोरगरीब रुग्णांना झाला. साईबाबा सुपर रुग्णालय, साईनाथ रुग्णालय आणी कोविड सेंटर आदी ठिकाणी कोविड रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात आल्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना काही प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. यावर मात करण्यासाठी शिर्डीत ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच अत्याधुनिक आरटीपीरीआर लॅबची देखील निर्मिती करण्यात आली आहे. या कामांसाठी बगाटे यांचे मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक केले.
बगाटे यांचा सत्कार
या कामांची पोहोच पावती म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी बगाटे यांच्या कार्यलयात जावून त्यांचा सत्कार करून त्यांच्या कामाला पाठिंबा दिला. यावेळी राज्यातील गोरगरीब रुग्णांना वरदान ठरलेल्या साईबाबा सुपर हॉस्पिटलमधील कोविड रुग्णांना कोविड सेंटरमध्ये हलवून, या सुपर हॉस्पिटलमध्ये पुर्वीप्रमाणेच रुग्णांवर उपचार सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी बगाटे यांनी मान्य केली. शिर्डी ग्रामस्थांनी आजवर चांगल्या कामाला पाठींबा देण्याचीच भुमिका बजावलेली असून, यापुढेही ती कायम ठेवली जाणार असल्याचे कैलास बापू कोते व अभय शेळके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगीतले.
हेही वाचा - शिवभोजन थाळी आता १४ जूनपर्यंत मोफत, उद्दीष्टामध्येही दीडपट वाढ