अहमदनगर - शहरात मोकाट कुत्र्यांचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून या कुत्र्यांनी अडीच वर्षाच्या मुलाचा बळी घेतला आहे. अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यानच चिमुकल्याचा मृत्यू झाला.
कोठला परिसरातील एसटी कॉलनी भागात राहणाऱ्याआयुष प्रजापती या मुलाला कुत्र्याने ४ ते ५ ठिकाणी चावा घेतला होता. डोक्याला चावा घेतल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. प्रथम त्याला नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. दरम्यान, अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.
याप्रकरणी नागरिक चांगलेच आक्रमक झाले. संतप्त झालेल्या नागरिकांनी महानगरपालिकेमध्ये उपायुक्त यांना घेराव घातला. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करा, अशीमागणी यावेळी नागरिकांनी केली आहे.