शिर्डी(अहमदनगर) - साईबाबांच्या शिर्डीत वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेत साईबाबा संस्थानच्यावतीने भाविकांना दिल्या जाणाऱ्या साई दर्शन पासेसमध्ये बदल करण्यात आला असल्याची माहिती साई संस्थानकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा - सचिन वाझेंनी परस्पर पुरावे लांबवले, पोलीस दप्तरी नाही नोंद
दर्शन पासेस मिळण्याच्या वेळेत बदल
शिर्डीत उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात घेऊन साईबाबा संस्थानकडुन भाविकांना साई दर्शनासाठी मंदिरात जाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सशुल्क आणि मोफत बायोमेट्रीक पासेसच्या वितरण वेळेत बदल करण्यात आले आहेत. आता सकाळी 11.30 ते 4 या दरम्यान सशुल्क आणि मोफत बायोमेट्रीक पासेस बंद ठेवण्यात येणार आहेत. कुठल्याही भाविकाला यावेळेत पासेस दिले जाणार नसल्याचे फलक साई संस्थानच्यावतीने साई मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. भाविकांनी याची दखल घेण्याचे आवाहन साई संस्थानकडुन करण्यात आले आहे.
साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात. त्यात आता उन्हाळा सुरु झाला असल्याने दुपारी उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. यामुळे भाविकांना उन्हाचा त्रास कमी व्हावा यासाठी आता साई संस्थानच्यावतीने भाविकांना साई दर्शनाचे पासेस पहाटे 6 ते सकाळी 9 आणि दुपारी 4 ते रात्री 9 दरम्यान भाविकांना दिले जाणार आहेत. या वेळेत भाविकांनी दर्शनाचे घेतलेले पासेसवर दिवसभरात कधीही साई मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे. दुपारी साई दर्शन पासेस वितरण बंद असले तरी ऑनलाईन पद्धतीने भाविकांनी साई दर्शन पास काढून दर्शन घेऊ शकणार आहेत.
हेही वाचा - जामनेरमध्ये कोविडपेक्षा गैरसोई भयंकर, कोविड सेंटरमधून १५ रुग्ण पळाले