अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटलांना आता माजी विरोधी पक्षनेता म्हणायचे का ? असा प्रश्नकरत ते विरोधी पतक्षनेते राहोत अथवा न राहो त्यांच्यासमोर नामदार हे कायम राहणार असल्याचे सुचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यामुळे विखे पाटील आता भाजपमध्ये जाणार आणि मंत्री होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आज लोणीत दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप-शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती. राधाकृष्ण विखे पाटलांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे दिला आहे. तो स्वीकारण्यातही आला आहे. मात्र, तो अद्याप विधानसभा अध्यक्षांनी मंजुर करायचा आहे.
चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांना टोला
शेतकऱ्यांचे राजे म्हणवणारे नेते प्रत्येक विषयाचा विपर्यास करत असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. जिथे-जिथे चारा छावणीची मागणी करण्यात आली आहे, ती आम्ही पूर्ण केली आहे. आणखी ज्या ठिकाणी आवश्यकता असेल त्या ठिकाणी चारा छावणी सुरू करू, असेही पाटील म्हणाले.
नारायण राणेंच्या आत्मचरित्रात माझे नाव नाही. त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलावे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राणेंच्या विषयाला बगल दिली.