अहमदनगर - तिसगाव परिसरातील सुमारे 12 गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. बिबट्याचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी नेमणुकीची जागा सोडणार नाही. माणसाचा जीव महत्त्वाचा असून बिबट्याला जिवंत अथवा मृत पकडून नागरिकांना दिलासा द्या. कोणत्याही प्रकारची कर्तव्यात कसूर खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा राज्यमंत्री प्राजक्तन तनपुरे यांनी देत बिबट्याला पकडण्याचे आदेश वनविभागाला दिले.
नागरिक भीतीच्या वातावरणात
या घटनेची माहिती कळताच शुक्रवारी सकाळी राज्यमंत्री तनपुरे यांनी शिरापूर येथे जावून बुधवंत कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी वनविभागाच्या हलगर्जीपणाबद्दल पाढा वाचत वनविभागाच्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी तनपुरे यांच्याकडे केली. यावेळी तनपुरे म्हणाले की, या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून नागरिक भीतीयुक्त वातावरणात जीवन जगत आहे. वनविभागाने तातडीने बिबट्याला पकडण्यासाठी योग्य ती कारवाई करावी. यामध्ये वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या बिबट्याचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत एकही कर्मचारी नेमणुकीचे ठिकाण सोडणार नाही. आता चौथा बळी आम्हाला घालवायचा नसून माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. या बिबट्याला जीवंत अथवा मृत पकडावे, असे आदेश तनपुरे यांनी वनविभागाला दिले.