अहमदनगर : साईबाबांच्या शिर्डीत वाढलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, शिर्डीतील हेलिपॅड रोडवरील चांगदेव कोते यांच्या खोलीमध्ये अवैध विक्रीकरीता आणलेला गांजाचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. प्राप्त माहितीच्या आधारे हेलिपॅड रोडवरील चांगदेव कोते यांच्या खोलीमध्ये पोलीस पथकाने पंचासह छापा टाकला.
साहित्य घेतले ताब्यात : चांगदेव कोते यांच्या खोलीमध्ये 3 लाख रुपयांचा 21 किलो गांजा मिळून आला. त्यासोबतच घटनास्थळावर वजन काटा, प्लास्टिकच्या पिशव्या, खाकी रंगाची चिकट टेप, कटर हे साहित्य देखील मिळून आले. चांगदेव कोते यास ताब्यात घेण्यात आले, तर इतर आरोपी फरार झाले आहेत.
यांनी केली कारवाई : दत्तात्रय बाबुराव करपे, अनिता दत्तात्रय करपे, शुभम दत्तात्रय करपे हे तीन आरोपी फरार असून, यांचा शोध शिर्डी पोलिस करत आहेत. या आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम 20 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करा : शिर्डीमध्ये आजही अवैध दारू विक्री, जुगार अड्डे, गुटखा विक्री असे अनेक अवैध धंदे सुरू असून तरुण पिढी यामध्ये बरबाद होत आहे. शिर्डी पोलिसांनी सातत्याने अशा प्रकारच्या कारवाई करून अवैध धंदे करणाऱ्यांवर चपकार बसवण्यासाठी कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी, नागरिकांकडून केली जात आहे.
हेही वाचा -