अहमदनगर - संगमनेरमधील तिरंगा रोड परिसरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या ६ जणांना शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली. आरोपींकडून ३ मोटार सायकलींसह मोठ्या प्रमाणात हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
अनर्थ घडण्यापूर्वीच पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे शहरातून कौतुक होत आहे.कारवाई दरम्यान ३ आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, लांडे, विजय पवार सुभाष बोडखे, विजय खण्डीझोड, अमृत आढाव, साई तळेकर यांनी पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या.
शुक्रवारी पहाटे मालदाड रोडवरील तिरंगा चौकात काही संशयित हालचाली सुरू असल्याचा शहर पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आला. त्यांनी दबा धरून त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता ते मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना कळले. त्यांच्याकडून तीन मोटार सायकलसह करवत, कुर्हाड, गिरमीट मशीन, तलवार सुताची दोरी, असा जवळपास एक लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी पो. कॉ. सागर धुमाळ यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी सचिन गोपीनाथ म्हस्कुले (वय २८, रा.धांरदरफळ), विजय लखन तामचीकर (वय २५, रा.राहुरी), भिमा बाजीराव डोके (वय २०, रा.धांदरफळ), राहुल अशोक गुंजाळ (वय १९, रा.निमज), गणेश संभाजी पर्बत (वय २४, रा.निंभाळे) व शेखर साहेबराव कातोरे (वय २८, रा.सांगवी) या ६ जणांना अटक केली असून त्यांच्यावर भा. द. वी. कलम ३९९, ४०२ सह भारतीय हत्यार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपअधिक्षक अशोक थोरात, पो. नि. अभय परमार यांच्या मार्गदर्शनखाली पो. उ. नि. पंकज निकम करीत आहेत.