शिर्डी : कालिकानगर परिसरातील मयुरेश्वर कॉलनीत राहणाऱ्या कुलथे कुटुंबियातील सतरा वर्षीय श्रुती नवनाथ कुलथे ही अल्पवयीन मुलगी दिनांक 2 मे रोजी सायंकाळी घरी एकटीच होती. मयत मुलीची आई अर्चना घरी आल्यानतर घरातील बेडरूममध्ये श्रुती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तेव्हा तिची हत्या झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नदकुमार दुधाळ आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल होते. घटनेचा पंचनामा करत फॉरेन्सीक टिमची मदत घेत पोलीसांनी तपास सुरु केला आहे. घटना नेमकी कशामुळे झाली हे अजुन स्पष्ट झालेले नाही. सदरील घटनेचा तपास पोलिस करीत आहेत.
बहीण भावाच्या वादातून खूनाची कबुली : मयत मुलीचा भाऊ घरातुन गायब असुन त्याचा फोनही बंद असल्याच समोर आले होते. शिर्डी पोलीसांनी अधिक तपास करत असतांनाच नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात एक इसम अल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या अंगावरील कपड़े रक्ताने भरलेला असुन शहरात दुचाकीवर फिरत होता. त्याला येवला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने चौकशी दरम्यान आरोपीने बहीणीचा खून केल्याची कबुली दिली. येवला पोलिसांनी शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून सदर आरोपीची माहिती दिली. यानंतर शिर्डी पोलिसांची टीम येवला येथे दाखल झाली.
गुन्हा दाखल : आरोपी श्रुत कुलथे याला ताब्यात घेऊन शिर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. आरोपी श्रुत कुलथे याने आपल्या लहान बहिणीची हत्या केल्याची माहिती शिर्डी पोलिसांना दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी आरोपी श्रुत कुलथे याला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. भाऊ-बहिणीत एवढी भांडणे का झाली? ज्यात रागाच्या भरात भावाने बहिणीची निर्घृण हत्या का केली? याचा उलगडा आता शिर्डी पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे.