शिर्डी - कोरोनाच्या प्रादुर्भावास अटकाव करणयासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे साईनगरी शिर्डीसह पंचक्रोशीचे अर्थकारण ठप्प झाले आहे. येथील व्यावसायिक अडचणीत आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता अंत न पाहता, मंदिरे उघडण्याची परवानगी द्यावी, अन्यथा तिव्र आंदोलन करू, असा इशारा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
कोरोना महामारीत अपयशी ठरलेल्या व समन्वय नसलेल्या महाविकास आघाडी सरकारचे वसुलीकडे लक्ष आहे. बार सुरू आहेत, कार्यक्रम सुरू आहेत, देशभरातील मंदिरेही उघडी आहेत. केवळ महाराष्ट्रातील आणि साई मंदिरच बंद का? असा सवाल तांबे यांनी उपस्थित केला आहे.
लसीकरण झालेल्यांना दर्शनाची परवानगी द्या-
कोरोनाच्या या निर्बंधामुळे अनेकांच्या मुलांचे शिक्षण, लग्नकार्य थांबले आहे. कर्ज हप्ते थकल्याने हॉटेल, दुकाने सील केली जात आहेत, नगरपंचायतीकडून करवसुली सुरूच आहे. तसेच फायनान्सवाले वसुलीसाठी तगादे लावत आहेत, वीज मंडळाने वसुलीसाठी निर्दयीपणे हजारावर वीज जोडण्या तोडल्या आहेत. नगरपंचायतने कर कमी करण्यासाठी सरकारकडे पाठवलेला प्रस्तावही धुळखात पडला आहे. साईमंदिराने सुरक्षित दर्शन व्यवस्था केली आहे. मागील वेळी मंदिर उघडल्यावर कुणालाही बाधा झालेली नाही. त्यामुळे ज्यांचे लसीकरण झालेले आहे, अशा भाविकांसाठी ऑनलाईन बुकींगद्वारे दर्शन सुरू करावे, आणि मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा तांबे यांनी दिला आहे.