मुंबई - राज्यामध्ये होत असलेल्या महिलांवरील अत्याचार घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, या घटना रोखण्यास राज्य सरकार अपयशी झाल्याचा आरोप करत, सोमवारी राज्यात विविध ठिकाणी भाजपा महिला आघाडीकडून महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात तीव्र निर्दशने केली.
राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे, मात्र याबाबत सरकारला गांभीर्य नसल्याचे सांगत सोमवारी भाजपाच्यावतीने राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. अहमदनगरच्या शेवगाव-पाथर्डी येथे भाजपा महिला आघाडीच्यावतीने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रमध्ये दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून ही स्थिती चिंताजनक आहे. मात्र, तरीही राज्य सरकार याबाबत कारवाई करत नसल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
तर, राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवरील आत्याचार वाढले असून महिलामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे, त्यामुळे महिला अत्याचारविरोधी कडक कायदे करावे, अशी मागणी करत औरंगाबाद कन्नड येथे भाजपा तालुका महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
ठाकरे सरकारच्या विरोधात भाजपच्या महिला मोर्चाने ठाण्यातील मीरा भाईंदरमध्ये निदर्शने केली. यावेळी महापौर जोस्ना हसनाळे यांच्यासह संपूर्ण महिला मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी सरकारने महिलावरील अत्याचार प्रकरणी कठोर पावले उचलली पाहिजेत, अन्यथा भाजपा अधिक तीव्र आंदोलन करणार असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
तर, नांदेडमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी आयटीआय चौकात आक्रोश आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढतच आहेत. त्यामुळे झोपलेल्या आघाडी सरकारला जागे आणण्यासाठी हे आक्रोश आंदोलन करण्यात आल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
बीडमध्येही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भाजपा व महिला आघाडीने राज्य सरकारविरोधात निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. महिला अत्याचाराच्या घटना रोखण्याच्या संदर्भाने सातत्याने मागणी करून देखील कुठल्याच उपाययोजना राज्य सरकार करत नाही. त्यामुळे झोपलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी आम्ही भाजपा महिला आघाडीच्यावतीने राज्यभरात आक्रोश आंदोलन केले, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
तर, राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे. त्यातच कोरोना महामारीसारख्या अतिसंवेदनशील काळातही शासनाच्या कोविड सेंटर व रुग्णालयात महिलांवरील अत्याचार होण्याचे प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे हे सरकार महिला सुरक्षिततेबाबत उदासीन, असंवेदनशील व निष्क्रीय असल्याचे आरोप करीत बुलडाण्यातील खामगावात भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले.
राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत वाढ झाली असून महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या विरोधात कारवाई करण्यात महाविकास आघाडी सरकार अकार्यक्षम आहे, असा आरोप करत महाविकास आघाडी सरकार विरोधात पालघर जिल्हा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
तर पुण्यातही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वात भाजपा महिला आघाडीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकार विरोधात निदर्शने करत महिला अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यात आला.
तर, चंद्रपूरमध्येही राज्य सरकारविरोधात निदर्शने करत भाजपा महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले.