अहमदनगर - महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली चुकीची बिले माफ करण्यास नकार दिल्याने भारतीय जनता पार्टीतर्फे आज राज्यभरात वाढीव वीज बिलासंदर्भात आंदोलन करण्यात आले. शिर्डीतही भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स येथे वीज बिलाची होळी करत आंदोलन करण्यात आले.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तब्बल आठ महिने शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते, या लॉकडाऊन काळात भाविक शिर्डीत येत नसल्याने सर्वच व्यवसाय ठप्प झाले होते. मात्र, लॉकडाऊन होण्यापूर्वी शिर्डीतील एका लॉजिंगचे लाइट बील महिन्याला साधरणतः 45 ते 50 हजार रुपये इतके येत होते. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर भाविक शिर्डीत येत नव्हते. त्यामुळे हॉटेल आणि लॉजिंग पूर्णपणे बंद होते. या काळात विजेचा वापरही केला गेला नसतानाही महावितरणकडून पूर्वीप्रमाणेच वीजबिलाची आकारणी करण्यात येत असल्याने सर्वच हॉटेल व्यावसायिक तसेच सामान्य नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे, अशी मागणी यावेळी भाजप शिर्डी शहर अध्यक्ष सचिन शिंदे यांनी केली आहे.
राज्य सरकारने काही अटी आणि शर्थी घालत तब्बल आठ महिन्यांनंतर दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डी साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले केले आहे. दररोज आठ हजार भाविकांना साई दर्शन दिले जात असल्याने अजूनही शिर्डीतील व्यवसायाला पूर्ण चालना मिळाली नसल्याने आधीच आर्थिक संकटात सापडलेले शिर्डीकर आता वाढीव लाईट बिलामुळे हैराण झाले आहेत.