शिर्डी (अहमदनगर) - कोरोनाच्या नियंत्रणासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही. टास्क फोर्सने आरोग्य सुविधांच्या मुलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रीत करायला हवे, लॉकडाऊन बाबत विचार करणाऱ्या टास्क फोर्सच्या अधिका-यांनी ग्रामीण भागातील समस्यांचा विचार कला आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून लॉकडाऊन लावण्यापूर्वी मदतीचे पॅकेज जाहीर करा, अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शिर्डी येथे अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नाही असे स्पष्ट मत व्यक्त करून विखे पाटील म्हणाले की, लॉकडाऊनचा निर्णय करणाऱ्या टास्क फोर्सचे अधिकारी मंत्रालयात बसून सरकारला सूचना करीत असतील तर ते उचित नाही. या अधिकाऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यात जाऊन वास्तव परिस्थिती जाणून घेतली काॽ ग्रामीण भागातील प्रश्नांची मंत्रीमंडळात चर्चा होताना दिसत नाही. मंत्र्यांची विधान फक्त शहरी भागाची काळजी करणारे दिसतात, शहरी भागाबरोबरच लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागाचे मोठे नूकसान होईल, याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
थोरातांवर केली टिका
यापुर्वीच कोरोनामुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, सामान्य व्यापारी, बारा बलुतेदार, सलून चालक आर्थिक संकटात भरडला गेला आहे. आता पुन्हा त्यांच्या समोर लॉकडाऊनमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा टास्क फोर्स विचार करत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करून या सर्व घटकांना मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. तर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, नियतीने आम्हाला विरोधी पक्षात बसायची भूमिका दिली असली तरी, ती आम्ही यशस्वीपणे पार पाडत आहोत. पण तुम्हाला तर नियतीने मंत्री केले याचा राज्याला आणि जिल्ह्याला काय फायदा झाला असा खोचक सवाल त्यांनी केला. आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी कोव्हीड काळात केलेल्या कामाचे ऑडीट मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
बैठकीत दिल्या सूचना
साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाबरोबरच साई आश्रमातील इमारतीत अधिकच्या बेडची उपलब्धता करा, शिर्डी येथील कोव्हीड टेस्टींगचे सेंटर तातडीने सुरु करुन, टेस्टींगची संख्या वाढवा आणि नव्याने सुरु होणाऱ्या कोरोना रुग्णालयात खासगी डॉक्टरांची मदत घेऊन उपचार सुरु करण्याबाबतच्या सूचना विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शिवाय यावेळी तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा जाणून घेतला. आरोग्य केंद्रामध्ये होत असलेल्या कोरोना टेस्टच्या आकडेवारीत कमतरता असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संबधित आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात टेस्टींगचे प्रमाण अधिक वाढविण्याची सुचना त्यांनी सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहे.
हेही वाचा-नाहीतर संघर्ष अटळ आहे..! भाजप आमदार नितेश राणेंचा सरकारला इशारा