अहमदनगर- माजी विरोधीपक्ष नेते आणि भाजप आमदार राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी सायंकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसह आपल्या काही कृषी मागण्यांसाठी अण्णा आग्रही असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. याबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी राधाकृष्ण विखे यांनी अण्णांची भेट घेत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.
फणडवीसही येणार-
केंद्र सरकार शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्यावर लवकरात लवकर मार्ग काढत आहे, त्यादृष्टीने अण्णांशी चर्चा करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे पुढील आठवड्यात राळेगणसिद्धी मध्ये येत आहेत. ते अण्णांशी चर्चा करणार आहेत. तसेच अण्णांच्या सूचना आपण केंद्र सरकार पर्यंत पोहोचवणार असल्याचेही असल्याचे विखे यांनी सांगितले.
अण्णा आंदोलनावर ठाम!!
अण्णा हजारे यांनी दिल्लीत रामलीला मैदानावर बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर मात्र, केंद्र सरकार खडबडले असून आतापर्यंत दर चार दिवसाला भाजपचा कोणीं न कोणी नेता राळेगणसिद्धी मध्ये येऊन अण्णांची समजूत काढताना केंद्र सरकारकडे बोलणी सुरू असल्याचे सांगत आहे. मात्र अण्णांनी आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करताना आपण दिल्ली आंदोलनावर ठामच असल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
मिळेल त्या ठिकाणी आंदोलन करणार-
सरकारकडे दोन वर्षे वाट पाहिली आहे, चार वर्षांपासून यासाठी आपण आग्रही राहिलो आहोत, दोनदा आंदोलने केली आहेत, त्यामुळे आता सरकारवर विश्वास राहिला नसल्याचे अण्णांनी सांगितले आहे. आता आपल्या मागण्यांची थेट अंमलबाजवणी हाच यावर मार्ग असून सरकार तसा निर्णय घेत नसेल तर आपण दिल्लीत मिळेल त्या ठिकाणी आंदोलन करणार, असे अण्णांनी दोन दिवसांपूर्वीच ई टीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले आहे.
केंद्र सरकार बदला घेतेय?-
आपल्या पत्राला उत्तर न देणारे आणि आंदोलनासाठो जागा मिळू न देणारे सरकार आपल्याशी बदल्याची भावना ठेवत असल्याचा संशयही अण्णांनी व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. एकंदरीत भाजपचे राज्यातील वरिष्ठ नेते राळेगणसिद्धी वारी करत असले तरी अण्णा अजून कुणाला बधले नाहीत, आता देवेंद्र फडणवीस हे येणार असून त्याभेटीत काय होते, याकडे लक्ष असणार आहे. विशेष म्हणजे आंदोलन केंद्र सरकारशी निगडित असताना अद्यापि केंद्राचा कोणी प्रतिनिधी अण्णांना भेटण्यासाठी आलेला नाही.