अहमदनगर - आज सकाळी मुबंई भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी नगर दक्षिणमधून खासदार दिलीप गांधी यांनाच पुन्हा लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशास विरोध केला गेला.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी केबिनमध्ये चर्चा करून भावना समजून घेतल्या. यावेळी ज्येष्ठ नेते आसाराम ढुस, सुनील रामदासी, शांतीलाल कोपणार, बाळासाहेब सोनवणे, विक्रम तांबे, अनिल खिळे, बबनराव डावखर यांच्यासह अनेक तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
नाराजी कार्यकर्त्यांची..नाराजी मुख्यमंत्र्यांची!
वसंतस्मृती कार्यालयात आयोजित बैठकीस राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या समोरच विद्यमान खासदार दिलीप गांधी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत दिलीप गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, बाहेरचा उमेदवार नको, अशा घोषणा दिल्या.
डॉ. सुजय विखे यांचा पक्ष प्रवेश आणि उमेदवारी निश्चितीच्या बातम्या सातत्याने येत असल्याने गांधी समर्थक कार्यकर्ते अस्वस्थ झाले. त्यामुळे उत्स्फूर्त घोषणाबाजीने संपूर्ण भाजप कार्यालय दणाणून गेले. राज्यातील इतर पदाधिकारी-कार्यकर्ते आणि मुख्य म्हणजे माध्यम प्रतिनिधींच्या समोरच ही घोषणाबाजी झाल्याने स्वतः मुख्यमंत्री फडणवीस नाराज झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष शिस्त पाळली पाहिजे, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.