अहमदनगर - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने दिलेली अश्वासने न पाळल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे काल सोमवारी विधानसभेचे माजी सभापती आमदार हरिभाऊ बागडे, राज्यभेचे खासदार डॉ.भागवत कराड आदी भाजप नेत्यांनी अण्णांनी कृषीविषयक मागण्यांवर पुन्हा आंदोलन करू नये, यासाठी भेट घेतली. यावेळी अण्णा हजारे यांनी केंद्र सरकार दिलेली आश्वासनरुपी वचन पाळत नसल्याने अशा देशात जगण्याची इच्छा राहिली नसल्याची उद्विग्न भावना व्यक्त केली आहे.
यावेळी अण्णांनी आपल्या 2018 आणि 2019 मध्ये केलेल्या आंदोलनाची आठवण करून दिली. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या मागण्या सोडवण्याबाबत आश्वासन दिले होते. याकडे मी सरकारने दिलेले वचन म्हणून पाहतो. मात्र सरकार जर हे वचनरुपी आश्वासने पाळणार नसतील तर अशा देशात जगण्याची इच्छा राहिली नाही, अशी उद्विग्न भावना अण्णा हजारे यांनी बागडे आणि खासदार कराड यांच्यासोबत चर्चे दरम्यान व्यक्त केली आहे.
स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी गरजेची-
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी. त्यासाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव (सी-टू प्लस फिफ्टी) सरकराने शेतकऱ्यांना द्यावा, कृषी मुल्य आयोगास स्वायत्तता द्यावी व भाजीपाला दुध व फळे यांनाही उत्पादन खर्चावर अधारीत बाजार भाव द्यावा. तसेच ठिबक व तुषार सिंचनावर अनुदान दिले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असेही अण्णा हजारे म्हणाले.
भाजप नेत्यांकडून नव्या कायद्यांची माहिती-
डॉ.भागवत कराड व हरिभाऊ बागडे यांनी केंद्र सरकारने नव्याने केलेल्या कृषी कायद्याची माहिती हजारे यांना दिली. नवे कायदे कसे शेतकरी हिताचे आहेत, हेही सांगितले. यावेळी त्यांनी कृषी सुधार कायद्याची मराठी भाषेत रूपांतरित केलेली पुस्तिकाही हजारे यांनी माहितीसाठी दिली. यावेळी हजारे यांनी नव्याने केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यातील काही कायदे रद्द केले. तरी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी मी माझ्या मागण्यांवर ठाम आहे असे सांगितले.
कराड, बागडे यांनी दिले हे आश्वासन-
तुमची मागण्या योग्य व शेतकरी हिताच्या आहेत. तुमचे गऱ्हाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे पोहच करू. मात्र सध्या तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ. तसेच लवकरच आपली एकत्रीत या विषयावर बैठकही लावू, अशे आश्वासन यावेळी बागडे व खासदार कराड यांनी दिले.
हेही वाचा- वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप
हेही वाचा- महाराष्ट्र गारठला, परभणीचा पारा ५.१ अंशावर