अहमदनगर - भाजपाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Vikhe Patil on Ajit Pawar ) यांच्या 63 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि प्रवरा अभिमत विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात मानपत्र देवून विखे पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा - NO Road To Go To School : शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्याने दाखला काढून घेतला
यानिमित्ताने अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी घेतलेल्या दिलखुलास मुलाखतीतून त्यांनी तोंडावर आलेली विधानपरिषद निवडणूक आणि राज्यसभा निवडणुकीत भाजपने खेचून आणलेल्या सहाव्या जागेवरून सुरू असलेल्या वाद-विवादाच्या पार्श्वभूमीवर अपेक्षा व्यक्त करून या वादास नव्याने फोडणी दिली. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यातील विविध समाजघटकांच्या हितासाठी अजितदादांनी पुन्हा आमच्या सोबत यावे आणि देवेंद्रजींनी राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आणावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना. त्यांनी सांगितले की, फडणवीस हे उत्तम प्रशासक आणि स्ट्रेट फॉरवर्ड नेते आहेत. त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपचे सरकार आणावे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि शब्दाचे पक्के आहेत. त्यांनी पुन्हा आमच्या सोबत यावे अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संयमी आणि मितभाषी आहेत. परंतु, त्यांनी चुकीच्या सल्लागारांना बाजूला करावे. यापुढे मला विरोधी पक्षनेता नव्हे तर मंत्री होणे आवडेल. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय राजकीय कारकिर्दीला कलाटणी देणारा आणि योग्यच होता. वडील सल्ला देण्यासाठी नसताना मी घेतलेला तो पहिलाच मोठा राजकीय निर्णय होता, असे विखे यांनी अभिमानाने सांगितले.
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आपल्यावर प्रभाव आहे. मोदी यांनी कोरोना काळात लसनिर्मितीला प्राधान्य दिले. जनतेला 180 कोटी लसमात्रा देऊन जगात सर्वोत्तम कामगिरी केली. रशिया-युक्रेन म्हणजेच एका अर्थाने रशिया-अमेरिका युद्धात मोदींनी मध्यस्थी करावी असे जगातील काही देशांचे प्रमुख म्हणतात. ही देशाच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. माझे वडील माजी खासदार दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचा माझ्या जीवनावर नेहमीच प्रभाव राहिला, असेही विखे पाटील यांनी मुलाखतील सांगितले. मंत्री अब्दुल सत्तार हे माझे जुने मित्र आहेत. त्यांनी संयम ठेवणे शिकावे, असा माझा त्यांना सल्ला आहे. मात्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना आपण कुठलाही सल्ला देऊ इच्छित नाही, असा टोलाही विखे पाटील यांनी थोरातांना लगावला.