अहमदनगर- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी थोड्याच दिवसात राज्यामध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे.
नगरमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक आमच्या सोबत येणार असल्याचे कर्डिले यांनी सांगितले. अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे नगरसेवक सुनील कोतकर यांनी ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून हे अध्यक्षपद मिळवले. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी कोतकर यांच्या नंतर अजूनही काही भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत येणार असल्याचे वक्तव्य केले होते. आमदार जगताप यांच्या वक्तव्यावर कर्डिले यांना विचारले असता त्यांनी, केंद्रात ज्या प्रमाणे भाजपचे सरकार आहे, त्याच प्रमाणे राज्यातही लवकरच भाजपचे सरकार येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे, नगरमधील भाजपचे नगरसेवक फुटणार नसून उलट नजिकच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीचेच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करतील, असा विश्वास कर्डिले यांनी व्यक्त केला.
मात्र, एकीकडे भाजपचे अनेक राज्यस्तरीय वरिष्ठ नेते, भाजप हे सरकार पाडणार नसून आम्हाला सत्तेची घाई नाही. आम्ही सक्षमपणे विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत, असे सांगत असताना कर्डिले यांनी मात्र राज्यात लवकरच भाजपचे सरकार येईल, असा दावा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हेही वाचा- राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा - विखे पाटील