अहमदनगर - नगर शहराला लागून असलेल्या भिंगार छावणी परिषद हद्दीतील प्रवेश कर नाक्यावर सध्या चक्क शिक्षक पावत्या फाडताना दिसत आहेत. ज्या शिक्षकी हातांना शाळेत विद्यार्थ्यांना विद्यार्जनाचे काम करावे लागते, त्याच हातांना सध्या हमरस्त्यावरील प्रवेश कर नाक्यावर पावत्या फाडण्याची वेळ आली आहे. भिंगार छावणी परिषदेच्या प्रशासकीय आदेशाने हा प्रकार घडत आहे.
भिंगार छावणी परिषदेने प्रवेश कर नाक्याच्या कर वसुली ठेक्याची मुदत 30 एप्रिलला संपली. या दरम्यान नवीन ठेका देण्याची प्रक्रिया सुरू असल्याने प्रवेश कर वसुली नाक्यावर छावणी परिषदेच्या इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. छावणी परिषदेच्या हद्दीतून पाथर्डी, सोलापूर आणि जामखेडकडे रस्ते जातात. यामार्गावर तीन प्रवेश कर नाके आहेत. त्यामुळे कर्मचारी कमी पडत असल्याने छावणी परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सात शिक्षकांना या कामावर नेमण्यात आले. सध्या हे शिक्षक छावणी परिषदेच्या हद्दीतील नाक्यावर पावत्या फाडण्यासाठी तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत.
छावणी परिषदेच्या प्रशासनाने तात्पुरती गरज म्हणून घेतलेला हा निर्णय असून सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी याकामी नेमले असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. भिंगार छावणी परिषदेचे कार्यकारी अधिकारी बी. एस. श्रीवास्तव यांनी शिक्षकांना सध्या सुट्या असल्याने आणि कर्मचारी कमी पडत असल्याने सर्वच विभागाचे कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात याकामी नेमणुकीस असल्याची माहिती दिली आहे.