अहमदनगर - बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये सहभागी होत विविध राजकीय पक्ष, संघटनांनी बंद यशस्वी करण्याचे प्रयत्न केले. नगर शहरातील प्रमुख मुख्य बाजारपेठा सकाळ पासूनच बंद होत्या.
शहरातील मार्केटयार्ड, माळीवाडा, जुना बाजार, नवीपेठ, चितळे रोड या ठिकाणी कडकडीत बंद दिसला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ बहुजन क्रांती मोर्च्याच्या वतीने सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक आंदोलकांनी सीएएच्या विरोधात आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - भारत बंद : राज्यात बंदला संमिश्र प्रतिसाद, अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण
नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या ठिकाणीही भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दुकाने, बाजारपेठा बंद असल्या तरी एसटी वाहतूक आणि इतर वाहतूक तसेच जनजीवन सुरळीत होते. तसेच कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.