अहमदनगर - महाराष्ट्रातील प्रमुख धरणापैकी एक महत्वाचे समजले जाणारे अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण 80 टक्के भरले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात ओढे - नाले खळाळुन वाहत असल्याने भंडारदरा धरणाच्या पाण्यात वाढ होतच आहे. परंतु भंडारदरा धरणाच्या पाणलोटात मात्र रविवारी पुन्हा पावसाने उसंत घेतल्याचे दिसुन आले.
आदिवासी बांधवाची भातशेतीही पाण्याखाली - अकोले तालुक्यात भंडारदरा धरण प्रमुख धरणापैकी एक महत्वाचे धरण समजले जाते. या धरणाच्या पाणलोटात जुन महिना कोरडा गेल्यानंतर 1 जुलै पासुन पावसाने धो - धो बरसने सुरु केले होते. पहिल्या पंधरवाड्याच पावसाने धुव्वाधार बॅटींग केल्याने खपाटीला गेलेले भंडारदरा धरण भरण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसुन आले. मागिल आठवड्यात तर पावसाने भंडारदरा पाणलोटासह कळसुबाई शिखराच्या भागातही हाहाकार केल्याने आदिवासी बांधवाची भातशेतीही पाण्याखाली गेली होती. पंरतु भंडारदरा धरणात मात्र दररोज पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत गेल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा वाढतच गेला. रविवारी( 17 ) हा साठा 8720 दलघफुटापर्यंत पोहचल्याने भंडारदरा धरण 80 % भरले असल्याचे पाटबंधारे विभागाकडुन सांगण्यात आले आहे .
भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 8720 दलघफु - गत चौविस तासात भंडारदरा येथे 105 मी मी पावसाची नोंद झाली आहे. घाटघर येथे 126 मी मी तर रतनवाडी येथे 129 मी मी व वाकी येथे 83 मी मी पावसाची नोंद झाली आहे. कृष्णावंती नदीवरील वाकी लघुबंधाराही भरलेला असुन कृष्णावंती नदी 578 क्युसेसने वाहत आहे. गत 48 तासात भंडारदरा धरणात 525 दलघफु नविन पाणी आले तर बारा तासामध्ये 168 दलघफुन नविन पाणी आल्याने भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 8720 दलघफु झाला आहे. तर निळवंडे धरणही 74 टक्के भरले असुन पाणीसाठा 6214 दलघफु झाल्याची माहीती निळवंडे धरण शाखेचे प्रमुख कुणाल चोपडे यांनी सांगितले आहे. तर बारा तासात भंडारदरा येथे 15 मी मी पावसाची नोंदणी झाली असल्याची माहीती भंडारदरा धरण शाखेचे शाखाधिकारी अभिजित देशमुख यांनी दिली.