अहमदनगर :श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर येथे नुकतीच शांतता कमीटीची बैठक पार पडली आहे. श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. मुस्लीम बांधवाचा सण बकरीईद तसेच हिंदू बांधवांचा पवित्र आषाढी एकादशी हे दोन्ही सण एकाच दिवशी येत आहे. त्या दिवशी काही अनुचित घटना घडू नये, म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता कमीटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर : दरम्यान, पोलीस प्रशासनाच्या वतीने काही सुचना करण्याच्या अगोदरच मुस्लीम बांधवांनी जाहीरपणे सांगितले की, आम्ही सर्व जण कायमच एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत आहोत. आषाढी एकादशी हा हिंदु बांधवांचा मोठा व पवित्र सण आहे. या दिवशी सर्व हिंदु बांधव पुजाअर्चा करुन उपवास करतात. याच दिवशी मुस्लीम बांधवांचा कुर्बानी देण्याचा सण बकरी ईद येत आहे. त्यामुळे हिंदु बांधवांच्या भावनांचा आदर करुन दोन दिवस कुर्बानी न देण्याचा निर्णय आम्ही सर्व मुस्लीम बांधवांनी सर्वानुमते घेतला आहे, असे हाजी ईस्माईल शेख, मोहसीन सय्यद, बाबुलाल शेख, अयाजअली सय्यद, जाकीर शेख, अजीज शेख यांनी सांगितले. मुस्लीम बांधवांनी हा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. या निर्णयांचे हिंदु बांधवाच्या तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
गावातच नाविण्यपूर्ण उपक्रम : बेलापुर गावाने नेहमीच समाजापुढे आदर्श ठेवण्याचा नेहमी प्रयत्न केलेला आहे. सर्वात प्रथम विनापोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडण्याचा यशस्वी निर्णय घेतला. त्यानंतर गाव सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा धाडसी निर्णय गावाने घेतला होता. गावाने दिपावलीनिमित्त आपली खरेदी आपल्या गावातच हा नाविण्यपूर्ण उपक्रम राबविला. तसेच राम मंदिराचे कोषाध्यक्ष बेलापूर गावचे वैभव आचार्य गोविंददेवगीरीजी महाराज यांच्याकडे राम मंदिर उभारणीसाठी 75 हजार रुपये देण्याचा देशातील पहीला मान बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी मिळवीला. तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे मुस्लीम बांधवांनी जागोजागी स्वागत केले. आता आषाढी एकादशी व द्वादशी या दोन दिवस कुर्बानी न देण्याचा धाडसी निर्णय बेलापुरच्या मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. राज्यात नव्हे देशात असा निर्णय घेणारे बेलापुर हे पहीले गाव ठरले आहे.
एक आदर्श : यावेळी जि.प. सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, मोहसीन सय्यद, प्रफुल्ल डावरे, हाजी ईस्माईल शेख, देविदास देसाई, आदिंनी मनोगत व्यक्त केले. समाजापुढे आदर्श ठेवण्याचे काम नेहमीच या गावाने केले आहे. सण, उत्सव शांततेत पार पाडा, याकरीता घेण्यात आलेल्या शांतता समीतीच्या बैठकीत मुस्लीम बांधवांनी एक वेगळाच आदर्श घालुन दिला असल्याचे मत पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा :
- Ashadhi Ekadashi 2023: श्रीगोंद्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; संत श्री महंमद महाराजांच्या दिंडीने पंढरपूरकडे केले प्रस्थान
- Ashadhi Ekadashi 2023: पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी; आषाढीनिमित्त नांदेड विभागातून पंढरपूरसाठी धावणार सहा विशेष रेल्वे
- Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून ही घोषणा...