शिर्डी - शिर्डी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच येथील मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे अपहरण झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. मात्र, अपहरणानंतर अपहरणकर्त्यांनी कोते यांना पहाटेच्या सुमारास शनि शिंगणापूर जवळ सोडून दिले. त्यानंतर त्यांनी स्वत: लोणी पोलीस ठाण्यात हजर होत या अपहरणकर्त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. नगराध्यक्ष पदाच्या निवडी अगोदर ही अपहरणाची घटना घडल्याने शिर्डीत खळबळ उडाली आहे.
मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते आपल्या मित्रांसोबत पुण्याला जात होते. दरम्यान रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रवरानगर फाट्याजवळील हॉटेल ग्रीनपार्क येथे जेवणानंतर थांबले होते. तेथे टाटा व्हिस्टा गाडीत आलेल्या चार जणांनी त्यांना बंदूकीचा धाक दाखवला. आणि त्यांना आपल्या गाडीत घालून पोबारा केला. त्यांच्या सोबत असलेल्या मित्रांनी लोणी पोलीसांना खबर देताच शोधाशोध सुरू झाली.
मात्र, त्यांचा तपास लागला नाही. पहाटेच्या दरम्यान अपहरणकर्त्यांनी नगरसेवक दत्तात्रय कोते यांना शिंगणापूर जवळ सोडून दिले. त्यांनतर कोते स्वतः लोणी पोलीस ठाण्यात सकाळी हजर झाले. अपहरणकर्त्यांनी कोते यांना राजकारणात पडू नको नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचे कोते यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हणले आहे.
आज लोणी पोलीस ठाण्यात दत्तात्रय कोते यांनी घडलेली सगळी घटना पोलीसांना सांगितली. त्यानंतर चार अज्ञात जणांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी अपहरणकर्त्यांचा शोध सुरू केला आहे. दोन दिवसांनंतर शिर्डीत नगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्यातून हा प्रकार घडला आहे की अन्य काही कारणामुळे हे अपहरण झाले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.