अहमदनगर : महाराष्ट्र ही संत व समाजसुधारकांची भूमी आहे. महाराष्ट्राने कायम देशाला दिशा दिली असून सहकारातून ग्रामीण भागात समृद्धी निर्माण करण्यात स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून सर्वधर्मसमभाव व लोकशाही विचार जपणाऱ्या काँग्रेसमुळे समृद्ध भारताची उभारणी (Building a Prosperous India with Congress) झाली आहे. आमदार बाळासाहेब थोरात हे मोठा जनाधार असलेले लोकनेते असून राष्ट्रीय पक्ष अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्याअगोदरचा संगमनेरच्या सहकार पंढरीतील कार्यक्रम हा शुभसंकेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Rajasthan Chief Minister Ashok Gehelot) यांनी दिले आहे.
सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार- यशोधन कार्यालयाजवळ शेतकी संघाच्या प्रांगणात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सव कार्यक्रमानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री आमदार छगनराव भुजबळ हे होते. तर व्यासपीठावर काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात. आमदार डॉ. सुधीर तांबे आदी उपस्थित होते. यावेळी थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत डॉ अ.ह. साळुंखे यांना हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने डॉ. सुधीर भोंगळे यांना तर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील नेतृत्व पुरस्काराने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना गौरवण्यात आले. 1 लाख रुपये रोख सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यंत्रणांचा वापर करून सरकारा बरखास्त - यावेळी बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेवर आधारित आहे. काँग्रेसने सत्तर वर्षात देश उभा केला आहे. आज भारत हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रगत देश म्हणून ओळखला जातो ती काँग्रेसची देण आहे. मात्र सध्या काहीजण जाती-धर्माच्या नावावर राजकारण करत आहे. हे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. ईडी सीबीआय सारख्या यंत्रणांचा वापर करून विविध राज्यांमध्ये सरकार बरखास्त केली जात आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा दुरुपयोग या जातीयवादी शक्तींनी केला आहे. सध्या देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. साहित्यिक, पत्रकार, विचारवंत यांना कैद केले जात आहे. या हुकूमशाही विरुद्ध काँग्रेस हा पक्ष लढतो आहे. काँग्रेसला मोठी परंपरा असून कितीही संकटे आली तरी काँग्रेस खंबीरपणे उभा राहणार आहे. भारत जोडो आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून केंद्रीय सरकार राहुल गांधी यांच्या या आंदोलनाला घाबरले आहे .महाराष्ट्राने सहकार ही मौलिक देन देशाला दिली असून थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात व डॉ अण्णासाहेब शिंदे यांचे कार्य हे पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी राहणार असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेस हा पुरोगामी पक्ष- आमदार छगन भुजबळ म्हणाले की काँग्रेस हा त्याग व बलिदान असलेल्या पक्ष आहे .अकरा वर्ष जेलमध्ये राहून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आयआयटी, एम्स, विविध धरणें या सारखी पायाभूत सुविधा करून देशाला एक लौकीक प्राप्त करून दिला. मात्र सध्या जातीयवादी सरकार सत्तेवर आले आहे. भाजपा हे केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहेत. समतेचा विचार व लोकशाही टिकवायची असेल तर या जातीवादी शक्तीविरुद्ध एकवटले पाहिजे. थोरात व शिंदे या विचारवंतांनी समाज प्रबोधनाचा मंत्र सहकारातून दिला. तो संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहे. काँग्रेस हा पुरोगामी पक्ष असून या पक्षाची विचारधारा ही सर्वांना सोबत घेऊन जाणारी आहे .म्हणून भाजप काँग्रेसला घाबरत असल्याची टीकाही त्यांनी केली. आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की ,सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्याच्या समृद्धीचा पाया घातला तर डॉ अण्णासाहेब शिंदे यांनी कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणल देशाला हरित क्रांतीचा मंत्र दिला. या दोन महान विभूतींच्यामुळे हा प्रदेश सुपीक झाला असून त्यांचे विचारांवर आपली वाटचाल सुरू आहे.