अहमदनगर - नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत हद्दीत काही अनाहूत परिवार वास्तव्यास असून हे सर्व कुटुंब बांगलादेशी नागरिक असून त्यांची नावे थेट मतदारयादीत समाविष्ट असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.
नव्याने समाविष्ट नावे संशयास्पद
सुपा क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून पुढे येत असताना या विदेशी नागरिकांचा सुपा गावात वावर वाढला आहे. आता तब्बल 92 संशयित बांगलादेशी नागरिकांची नावे सुपा ग्रामपंचायत मतदारयादीत समाविष्ट असून याची चौकशी व्हावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. सुप्यासह नगर मनसेच्यावतीने सध्या हा मुद्दा लावून धरण्यात आला आहे. नव्याने मतदारयादीत समाविष्ट केलेली नावे संशयास्पद असून हे नागरिक नेमके कुठले यावर मनसेने प्रशासनाकडे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
चौकशीचे प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
याबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी पारनेर तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांना पत्र दिले असून याबाबतची खातरजमा पारनेर तहसीलदार यांच्यामार्फत करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले आहेत. याबाबत प्रांताधिकारी राजेंद्र भोसले यांनी सुपा ग्रामपंचायीकडून अधिकची माहिती मागवली आहे. कोणताही जातीय तणाव निर्माण होऊ नये आणि सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी प्रशासन कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.