अहमदनगर - राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अहमदनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोरोनाची रूग्णसंख्या आहे. संगमनेर शहरातील नगररोड येथील विघ्नहर्ता लॉन्समध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने पाचशे बेडचे कोविड केअर सेंटर सुरू आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्याठिकाणी जाऊन कोरोना रुग्णांशी संवाद साधला. त्यांच्या सोबत आमदार डॉ. सुधीर तांबे, विघ्नहर्ता लॉन्सचे संचालक राजेंद्र कुटे, काँग्रेस युवक शहराध्यक्ष निखील पापडेजा, एनएसयूआयचे गौरव डोंगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप आदी होते.
रूग्णांच्या सोयीसाठी कोविड सेंटर सुरू -
संगमनेर तालुक्यात कोरोनाची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन या रुग्णांच्या सोयीसाठी बाळासाहेब थोरात यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होता. त्यानुसार विघ्नहर्ता लॉन्स येथे अद्ययावत व चांगल्या दर्जाच्या सुविधा असलेल्या 500 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. यामध्ये महिलांसाठी 200 तर पुरुषांसाठी 300 बेड राखीव आहेत.
घरोघरी जाऊन केली जाणार तपासणी -
राज्यात आणि देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून सध्या ती मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे कोणीही निष्काळजीपणा करू नये. नागरिकांना देण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रशासनाला केलेल्या आहेत. संगमनेरमध्ये घरोघरी जाऊन तपासणी केली जाणार आहे. यामुळे कोरोनाची लागण झालेले रूग्ण लवकर लक्षात येऊन त्यांच्यावर संस्थात्मक विलगीकरणातून तातडीने उपाय करणे सोयीचे होईल, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध -
सध्या सर्वत्र ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. आपण ऑक्सिजन मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. कोरोना रूग्णांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवणे हाच त्यावर सर्वोत्तम पर्याय आहे. संगमनेर शहरामध्ये घरोघरी होत असलेल्या तपासणीला मोठे यश मिळाले असून त्यामुळे रूग्णसंख्या कमी झाली आहे. हाच फॉर्म्युला ग्रामीण भागामध्येही सुरू करण्यात आला आहे. प्रशासन व पदाधिकार्यांना तशा सूचना केल्या आहेत. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना हा कायम संकटाच्यावेळी तालुक्यातील नागरिकांसाठी मदतीला उभा राहिला आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात देखील कारखाना नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
हेही वाचा - दिलासादायक! राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले