अहमदनगर - दिल्ली सीमेवर सव्वादोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत, मात्र केंद्र सरकार हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी जमिनीवर खिळे मारून तारांचे कंपाउंड करण्यात आले आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यात शेतकरी नव्हे तर सरकार बदनाम होत आहे, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. अहमदनगर मध्ये माध्यमांशी बोलताना बच्चू कडू यांनी ही टीका केली आहे.
'सरकार विदेशी भांडवलदारांचे'
सरकार हे विदेशी भांडवलदारांचे असल्याचा आरोप करत सरकार आपली प्रतिमा खराब करत असल्याचे ते म्हणाले. कायद्याबाबत माघार घेता येत नसेल तर सरकारमधून माघार घ्यावी, असेही ते म्हणाले.
'सव्वा दोन महिन्यांपासून आंदोलन'
गेल्या सव्वादोन महिन्यांपासून आंदोलन सुरू असताना या शेतकऱ्यांना देशभरातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान शेतकऱ्यांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, मात्र यात शेतकरी बदनाम झाला की सरकार हा विषय आहे. देशाच्या सीमेवर नसेल इतकी सुरक्षा दिल्ली सीमेवर आहे. तारांचे कुंपण घालून जमिनीवर खिळे ठोकले जात आहेत, हे दुर्दैवी असल्याचे कडू यांनी म्हटले आहे. सरकारने आता आंदोलनाची आणि पर्यायाने देशातील शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.