अहमदनगर - जिल्हा न्यायाधीशांसह अन्य विश्वस्त असलेल्या पाथर्डी तालुक्यातील मोहाटा देवी मंदिर संस्थानच्या कारभाराविरोधात दाखल असलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यामध्ये अंनिसची तक्रार गृहीत धरून प्रकरणातील व्यक्तीवर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस उपअधीक्षकांना देण्यात आले. या प्रकरणी सहा महिन्यांच्या आत गुन्हा दाखल करण्यास औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात आला असल्याने या निकालाचे आम्ही स्वागत करत असल्याचे अंनिसच्या रंजना गवांदे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - वर्ध्यात दुसऱ्यांदा संकटग्रस्त पांढऱ्या गिधाडची नोंद
२ किलो सोने मंदिर परिसरात पुरले
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या मोहाटा देवी मंदिरात मांत्रिकाच्या मदतीने २ किलो सोन्याचे सुवर्णयंत्र पुरले गेले होते. याबाबत संस्थानचे विश्वस्त असलेल्या नामदेव गरड यांनी २०१६ मध्ये हा प्रकार उघडकीस आणत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात गरड यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली होती. देवस्थानच्या विश्वस्तांनी २ किलो सोने मंदिर परिसरात पुरले. त्यासाठी होमहवन, पूजा अर्चा करण्यासाठी २५ लाख रुपये मजुरी मांत्रिकाला दिल्याचे उघड झाले होते.
गुन्ह्याचा तपास सहा महिन्याच्या आत करावा
या जगदंबा देवी सार्वजनिक विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश असतात. याशिवाय ४ प्रशासकीय अधिकारी पदसिद्ध विश्वस्त असतात आणि इतर १० विश्वस्तांची नेमणूक मोहाटा गाव व मोहाटा गावाबाहेरील भक्तांमधून होते. गरड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच, या खटल्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही तक्रार दिली होती. त्यावरून जादूटोणा प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपअधीक्षक यांनी सहा महिन्याच्या आत करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी 'मराठा संघर्ष यात्रा' पुण्यातून रवाना