शिर्डी - शिर्डीमध्ये दरवर्षी राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राम नवमी उत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान उत्सव जरी साधेपणाने साजरा होत असला तरी देखील राम नवमीनिमित्त साईबाबांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
विद्युत रोषणाईच्या माध्यमातून घरी राहण्याचा संदेश
गेल्या वर्षी देखील कोरोनामुळे राम नवमी साधेपणानेच साजरी करण्यात आली होती, यावर्षी देखील कोरोनाची दुसरी लाट आल्याने शिर्डीमधील राम नवमी उत्सव भाविंकाच्या उपस्थितीविना अतिशय साधेपणाने पार पडत आहे. राम नवमीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईचे खास वैशिष्ट म्हणजे, साई मंदिराच्या गेट क्रमांक चार समोर एक कमान उभारण्यात आली आहे. या कमानीवर साई चरित्रातील अध्याय क्रमांक 23 मधील " घरी जाऊन स्वस्थ बैस ! घराबाहेर जाऊ नकोस ! राही निर्भय निश्चिंत मानस! ठेवीं विश्वास मजवरी " या ओव्या विद्युत रोषणाईच्या माध्यमातून साकारण्यात आल्या आहेत. साईबाबांच्या काळात हैजा नावाची महामारी आली होती. त्यावेळी साईबाबांनी सर्व भक्तांना घरी बसण्यास सांगितले होते. आता कोरोना माहामारीतही घरी बसणे आवश्यक असल्याने हा संदेश विद्युत रोषणाईच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती भाविक सुनील बारहाते यांनी दिली आहे. विशेष म्हणजे साईबाबांचे भक्त असलेले सुनील बारहाते यांनी त्यांच्या अन्य दोन मित्रांच्या मदतीने स्वखर्चातून ही विद्युत रोषणाई केली आहे.
हेही वाचा - 'भाजपा नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा, इतर किडेमुंग्या आहेत का?'