अहमदनगर - राहाता पोलीस स्टेशनचे कर्मचारी रशीद शेख आणि अजित अशोक ताटे यांनी गंठन चोरणाऱ्या चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केला. या हल्ल्यात अजित ताटे जखमी झाले. ही गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे.
राहाता येथील चितळी रोडवर पोलीस कॉन्सटेबल अशोक ताटे आणि रशिद शेख हे दोघे कार्यालयीन कामासाठी जात होते. त्यावेळी त्यांना दोन संशयास्पद दुचाकीस्वार आढळले. या दोघा संशयितांचा पोलिसांनी पाठलाग केला.
हेही वाचा - मॅनहोलमध्ये उतरणारे रोबोट मुंबई महानगरपालिकेच्या दिमतीला
भन्साळी कॉम्प्लेक्ससमोर दुचाकीस्वारांना थांबवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी त्यांच्याकडील गावठी कट्टा काढत, पोलिसांवर गोळीबार केला. मात्र, दोन्ही पोलिसांनी धाडस दाखवत या चोरांचा प्रतिकार केला. यात एका आरोपीला जागीच पकडण्यात यश आले, तर फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.