अहमदनगर - अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक आणि सात पोलीस कर्मचार्यांवर गैरवर्तनाचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश काढले. तत्पूर्वी 28 ऑक्टोबरला जिल्ह्यात याच महिन्यात हजर झालेले अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचीही तडखफडकी बदली करण्यात आली आहे. मात्र, त्यांना अद्याप बदलीचे नवीन ठिकाण देण्यात आलेले नाही.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे डॉ. दत्ताराम राठोड यांच्याकडे दरम्यानच्या काळात प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कारभार देण्यात आला होता. याच कालावधीत त्यांनी एक विशेष पथकही स्थापन केले होते. या पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक अवैध व्यवसायांवर धडक कारवाई करण्यात आली होती. त्याचे स्थानिक माध्यमातून कौतुकही करण्यात येत होते.
ऑडिओ क्लिपने केला अवैध 'अर्थपूर्ण'चा भांडाफोड?
सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ती अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड आणि नेवासा पोलीस ठाण्याच्या गर्जे नामक एका पोलीस कर्मचारी यांच्यातील असल्याचे बोलले जात आहे. राठोड यांनी मात्र ही व्हायरल ऑडिओ क्लिप अद्याप ऐकली नसल्याचे आणि आपणास याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. माध्यमांसमोर ते अद्यापही आलेले नाहीत. मात्र, एकूणच या व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संभाषण धक्कादायक आहे. नगर जिल्ह्यात अवैध व्यवसायातून कसे अर्थपूर्ण उत्पन्न आहे? यावर उहापोह आहे. कोण किती आणि कसे 'कमावतो', मासिक 'हप्ते' किती मिळतात, जिल्ह्याच्या उत्तरेत अधिक कमाई मिळते, काही व्यावसायिक अर्थपूर्ण मदतीसाठी कसे कामाचे आहेत आणि ही वसुली शक्य आहे, यासाठी आदेश द्या, आदी गोष्टी या व्हायरल क्लिपमध्ये आहेत.
ऑडिओ क्लिप तपासावी लागणार -
या व्हायरल ऑडिओ क्लिपची सत्यता आता तपासून पाहावी लागणार आहे. त्यात कथितपणे ज्यांची नावे चर्चेत आहेत, ती खरी की खोटी यावर नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना प्राधान्याने काम करावे लागणार आहे. यात खरेच कोणी दोषी आहेत का की यामागे काही कटकारस्थान आहे?, जिल्ह्यात इतका मोठा अर्थ-व्यवहार होत आहे का?, एका पोलीस ठाण्यामागे महिन्याकाठी 'पन्नास' घेणाऱ्या 'त्या' महिला अधिकारी कोण? किंवा खरेच इतके मोठे (अवैध) आर्थिक व्यवहार होतात का? यावर प्रकाशझोत टाकण्याचे आणि एकूणच यामुळे अहमदनगर पोलिस दलाची प्रतिमा खराब होत असेल, तर ती सुधारण्याचे काम वरिष्ठांना करावे लागणार आहे. राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाने जर काही होत असेल तर तेही समोर येणे गरजेचे आहे.
संपूर्ण पथकच निलंबित -
दरम्यान, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी बेकायदेशीररित्या डिझेलची वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई केली होती. या कारवाईची चौकशी सुरू आहे. यात राठोड यांची तडकाफडकी बदली झाल्याचे बोलले जाते. दुपारी टँकर पकडले असताना गुन्हा दाखल होण्यास झालेला उशीर, अर्थपूर्ण तडजोडीचे प्रयत्न यास कारणीभूत असल्याचे समजते. त्यातच अप्पर अधीक्षक राठोड यांची कथित आणि वादग्रस्त ऑडिओ क्लिप चर्चेत आली असताना त्यांनी स्थापन केलेले विशेष पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.
तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाईसाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. पथकाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटखा, अवैध धंदे, जुगार, मटका, क्लब, गोमांस आदीवर कारवाई केली. पथकातील एक पोलीस अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचे गुरुवारी निलंबन करण्यात आले आहे.
हेही वाचा - राज्य सरकारनेही ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला