अहमदनगर- वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात आपले कर्तव्य बजावत असताना कळत-नकळत बाधितांचा संपर्कात आलेले अनेक पोलीस कर्मचारीही बाधित झाले आहेत. सोमवारपर्यंत 3 पोलिसांचा त्यात दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. मुंबई पोलीस दलातील 3 कर्मचारी मृत्यू पावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
कोरोना विषाणूच्या युद्धात अवघे पोलीस दल अहोरात्र रस्त्यावर, गल्लीबोळात निष्ठेने आपले कर्तव्य बजावत आहे. या पार्श्वभूमीवर जीवाची बाजी लावणाऱ्या पोलिसांचा उचीत गौरव व्हावा, मृत कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सरकारने खंबीरपणे उभे रहावे, पोलिसांना अतिरिक्त वेतन द्यावे अशा विविध मागण्या समाज घटकांकडून होत आहेत.

पोलीस हा ही एक माणूस आहे, त्यालाही परिवार आहे. मात्र आपल्या घरगुती अडचणी बाजूला ठेवत तो समाजातील सर्व घटकांना मदत मिळावी म्हणून झटत आहे. कायदा-सुव्यवस्था सांभाळत आहे आणि कोरोना विषाणू विरुद्धच्या युद्धात घर-परिवार सोडून आज तो चोवीस तास रस्त्यावर असताना अनेकदा छुप्या बाधितांच्या संपर्कात येत आहे.

हजारवेळेस सांगूनही अनेक काही लोक विनाकारण रस्त्यावर येत आहेत. नागरिकांच्या या बेजबदार वागण्याची किंमत आता थेट पोलिसांना मोजावी लागत आहे. आता तरी ही बेजबाबदार मंडळी याची जाणीव ठेवणार का हाच खरा प्रश्न आहे.