अहमदनगर - कोरोना काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाची माहीती एका क्लिकवर मिळण्यासाठी शिर्डी विधानसभा मतदार संघातील नागरीकांसाठी स्वतंत्र अॅप उपलब्ध करुन देणार असल्याची माहीती भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
राहाता तालुक्यात असलेली कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटरची माहीती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सहज मिळत नाही. त्यामुळे नातेवाईकांचा वेळ रुग्णालय व बेड मिळविण्यासाठी जातो. मागील काही दिवसांत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विधानसभा मतदार संघातील नागरीकांची धावपळ कमी व्हावी म्हणून, रुग्णालयांची परिपूर्ण माहीती असलेल्या अॅपची सुविधा सुरू होईल. याबाबतची सर्व प्रक्रीया सुरू असून, थोड्याच दिवसात नागरीकांना आपल्या मोबाईलवर या अॅपच्या माध्यमातून रुग्णालयांची माहीती अतिशय सोप्या पद्धतीने मिळणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
या अॅपमध्ये प्रामुख्याने राहाता तालुक्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयात असलेले बेड, ऑक्सीजन बेड, व्हेन्टीलेटर बेड तसेच उपलब्ध असलेल्या सुविधांची माहीती प्रत्येक दिवशी अपडेट केली जाणार आहे. भविष्यात या अॅपच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेची माहितीही नागरीकांना मिळेल. गावनिहाय, तसेच शहरांमध्ये प्रभागनिहाय नागरीकांना लसीकरणाची माहिती दररोज उपलब्ध होईल. या अॅपच्या सहकार्याने अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या सहकार्याने मतदार संघातील कुटुंबाचे सर्वेक्षण करुन, सहा महिन्यात नागरीकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा मानस असून, लसीकरण करणारा शिर्डी विधानसभा मतदार संघ अव्वल ठरेल, असेही विखे पाटील म्हणाले.
कोरोनानंतर म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण प्रमाणात वाढत आहे. याबाबत नागरीकांचे प्रबोधन व्हावे म्हणून या अॅपच्या माध्यमातून या नवीन आजाराची लक्षणे आणि उपचारांबाबतची माहीती दिली जाणार असून, शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात स्वतंत्र विभाग आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टास्कफोर्स निर्माण करण्याबाबतही आपण सुचित केले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - 'फक्त यज्ञ करून कोरोना बरा होतो असे म्हणत असेलतर चुकीचे'