अहमदनगर- सत्तेसाठी सत्य सोडणाऱ्या सरकरकरच्या विरोधात आपले आंदोलन आहे. आश्वासन देऊन त्याची पूर्तता न करणे हे ठीक नाही, त्यामुळे मी आंदोलनावर ठाम असल्याचे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी आंदोलन करू नका म्हणून पाठवलेल्या प्रस्तावात आपल्या मागण्यांबाबत काहीही ठोस सांगितले नसल्याचा खुलासाही अण्णांनी यावेळी केला आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा
दिल्लीत सुरू असलेले आंदोलन असो वा मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आंदोलन असो, या सर्वांना आपला पाठिंबा आहे. मात्र सत्तेत बसलेल्यांच्या विरोधात विरोधी पक्ष कमी पडत असल्याची खंतही यावेळी अण्णांनी व्यक्त केली आहे.
अनेक नेत्यांनी घेतली अण्णांची भेट
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला सी टू प्लस फिफ्टी भाव, यात फळे, भाजीपाला, दूध याचाही समावेश, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्त दर्जा द्यावा या प्रमुख मागण्यांच्या अंमलबाजवणीसाठी अण्णा हजारे येत्या 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये बेमुदत उपोषण आंदोलन करणार आहेत. अण्णांनी आंदोलन करू नये, म्हणून राज्यातील भाजप नेते गेल्या पंधरा दिवसांपासून राळेगणसिद्धीची वारी करत अण्णांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.
केंद्रीय कृषि मंत्र्यांच्या पत्रावर असमाधानी
दोन दिवसांपूर्वीच राळेगणसिद्धीमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन हे नेते अण्णांना भेटून गेले, या भेटीत फडणवीस यांनी अण्णांना केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पाठवलेले प्रस्तावाचे पत्र दिले, या पत्रावर आणि त्यातील प्रस्तावावर आपण समाधानी नसल्याचे अण्णांनी स्पष्ट केले आहे. या पत्राचा अभ्यास कृषी तज्ञ करत असून त्यानंतर पत्राला उत्तर दिले जाईल, असंही यावेळी अण्णा म्हणाले आहेत.