अहमदनगर - दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटत आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत. केंद्र सरकारने स्वामिनाथन आयोग, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी मान्य कराव्यात, आदी मागण्या त्यांनी केल्या.
सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही. त्यामुळे देशातील सर्व शेतकऱ्यांनी भारत बंद आंदोलनात सहभागी व्हावे आणि सरकारला जागे करावे, असे आवाहन त्यांनी केले.
हा देश शेतकऱ्यांचा आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकल्याच पाहिजे. शांततापूर्ण वातावरणामध्ये हे आंदोलन शेतकऱ्यांनी एकजुटीने यशस्वी केले पाहिजे. कोणत्याही प्रकारची हिंसा या आंदोलनात करू नये. कारण, हिंसा झाली तर सरकारला ते आंदोलन मोडीत काढता येतं, असे ते म्हणाले.
सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावं -
अभूतपूर्व परिस्थिती शेतकऱ्यांनी एकजुटीने दिल्लीमध्ये दाखवली आहे. त्यामुळेे देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि सरकारला जाग करावं, असेही ते म्हणाले.
शेतकरी संघटनांची हाक -
गेल्या १२ दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली चलो आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळत आहे. सुरुवातीला केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमधील शेतकरीही दिल्ली सीमेच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवाय, आपापल्या राज्यांमध्येही शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. हे आंदोलन सुरूच ठेवत आज मंगळवारी ८ डिसेंबरला भारत बंद ची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.