अहमदनगर- 'मंदिरात राहणाऱ्या एका फकीर माणसाने सत्याग्रही मार्गाने एक नव्हे, दोन नव्हे तब्बल आठ कायदे राज्य आणि केंद्र सरकारला करण्यास भाग पाडले, हीच माझी ताकत आहे.' गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने चालत असताना सत्याग्रही आंदोलनाच्या मार्गानेच देश बदलू शकतो, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला आहे. लोकपाल-लोकायुक्त, शेतमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी ७ दिवस चाललेले उपोषण आंदोलन मागे घेतल्यानंतर राळेगणसिद्धी येथे यादव बाबा मंदिरात ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींशी बोलताना हा दृढविश्वास अण्णांनी व्यक्त केला.
अण्णा हजारे २००९ सालापासून लोकपाल, लोकायुक्त आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य आणि केंद्र सरकारशी आंदोलन करून भांडत आहेत. वास्तविक अण्णांनी आपल्या जीवनात १९८० पासूनच गांधीवादाचा मार्ग स्वीकारत अहिंसेच्या मार्गाने उपोषण करून सरकारविरोधात वेळोवेळी आंदोलने केली आहेत.
नुकतेच पार पडले आंदोलन हे अण्णांचे विसावे आंदोलन होते. या आंदोलनानंतर अण्णांनी आश्वासनांवर आंदोलन थांबवले, अशी टीका होत आहे. त्याबद्दल ते म्हणतात, 'मी अविवाहित माणूस आहे. माझ्याकडे कोणत्याही बँक बॅलेन्स नाही. मी मंदिरात राहतो. एक ताट आणि एक वाटी, एवढीच ती काय माझी संपत्ती.' मात्र, मी समाज आणि देश हितासाठी माझे उभे आयुष्य खर्च केले आहे. यातूनच सरकारला माझ्या उपोषण आणि मौन आंदोलनाची दखल घेत कायदे करणे भाग पडले. माझ्या आंदोलनामुळे ६ मंत्री आणि शेकडो अधिकाऱ्यांना आपली पदे सोडावी लागली आहेत. हीच मी केलेल्या आंदोलनाची मोठी ताकद आहे. मी काही जास्त शिकलेलो नाही, मात्र राज्यघटनेचा अभ्यास करून त्या माध्यमातून मी सरकारला वेळोवेळी पत्र लिहितो, आंदोलने करतो आणि सरकारला माझ्या आंदोलनाची दखल घ्यावी लागते.
राजकारण्यांनी गट-तट करून समाजाचे विभाजन करत देशाचे नुकसान केले-
अण्णांच्या आंदोलनात त्यांचा राळेगणसिद्धी परिवार नेहमी सोबत राहिला आहे. आंदोलन राळेगणसिद्धीत असो, पुणे, मुंबईत असो किंवा दिल्लीत असो. २०११ साली दिल्लीत रामलीलावर आंदोलन सुरू असताना इकडे राळेगणसिद्धी परिवारानेही एकजुट दाखवत अण्णांचे आंदोलन संपेपर्यंत सरकारवर दबाव वाढवला होता. राळेगण-सिद्धी सारखे गाव देशात सर्वत्र असावे, अशी माझी इच्छा आहे, असेही अण्णा म्हणतात. मात्र, गावागावात गट-तट करून राजकीय पक्ष दुहीचे राजकारण करताना दिसून येतात. यातून देशाची मोठी हानी होत असल्याबद्दल अण्णांनी नाराजी व्यक्त केली.