अहमदनगर - महिला रूग्णाला नाशिकहून पुण्याला घेऊन जाणारी रुग्णवाहिका चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध लावत, संगमनेर येथून रूग्णवाहिका आणि आरोपीला ताब्यात घेतले. महिला रूग्णाला उपचारासाठी पुण्याला पाठवले.
काय आहे घटना -
सोमवारी रात्री रूग्णवाहिका चालक योगेश म्हाळू रोंगटे (रा. कवडदरा, नाशिक) हे एक महिला रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना घेऊन नाशिक-पुणे महामागार्वरून पुण्याकडे निघाले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास घारगाव येथे हॉटेल लक्ष्मीसमोर रूग्णवाहिका उभी करून चालक पार्सल आणण्यासाठी गेला. त्याचवेळी रूग्णाचे नातेवाईकही लघुशंकेसाठी खाली उतरले. ते सर्व जण जेव्हा परत आले, त्यावेळी रूग्णवाहिका जागेवर नव्हती. रूग्णवाहिका चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. घारगाव पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तातडीने हालचाल्या केल्या. नाकाबंदी करून महामार्गावरील पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
संगमनेर पोलिसांनी घेतला रूग्णवाहिकेचा शोध -
काही वेळानंतर संगमनेर शहर पोलिसांना ही रूग्णवाहिका शहरातून जाताना दिसली. त्यांनी ती ताब्यात घेऊन घारगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. घारगावच्या पोलिसांनी तातडीने संगमनेरला जात रूग्णवाहिका आणि आरोपी वैभव सुभाष पांडे याला ताब्यात घेतले. रूग्णवाहिकेतील महिला सुरक्षित होती. त्यांना उपचाराची गरज असल्याने पोलिसांनी ही रूग्णवाहिका लगेच चालक रोंगटे यांच्या ताब्यात दिली. ते रूग्णाला घेऊन पुण्याला रवाना झाले. पोलिसांनी आरोपी पांडे याच्याविरोधात रूग्णवाहिका चोरीचा आणि महिला रूग्णाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्राथमिक चौकशीत चोरीच्या उद्देशाने त्याने हे कृत्य केल्याचे आढळले.