अहमदनगर - राज्यात काही भागात बरसत असलेल्या पावसाचा फटका प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजकीय नेत्यांनाही बसलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज अहमदनगर जिल्ह्यात दोन ठिकाणी प्रचार सभा होणार होत्या. यातील पहीली सभा ही भाजपाचे उमेदवार असलेल्या वैभव पिचड यांच्या अकोले येथे होणार होती.
दुपारी 1 वाजुन 10 मिनिटांनी शहा हे अकोल्यात येणार होते. मात्र नवापुर येथील सभा झाल्या नंतर ते अकोले येथे निघाले असता त्यांच्या हेलीकॉप्टरचे नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे इमरजन्सी लँडींग करण्यात आले. त्या नंतर पुन्हा त्यांनी अकोले येथे येण्याचा प्रयत्न केला मात्र हवामान खराब असल्याने ते येऊ शकले नाहीत.
अकोले येथील सभा स्थळी सकाळी अकरा वाजले पासूनच लोक येण्यास सुरवात झाली होती. मात्र दुपारी तीन वाजूनही अमीत शहा येत नसल्याने हळू हळू सभा स्थळा वरील गर्दी कमी होऊ लागली. अखेर साडेतीनच्या दरन्यान जेष्ठनेते मधुकर पिचड यांनी भाषणास सुरवात करत सभेचा वेळ चार वाजे पर्यंतच असल्याने आता अमीत शहा येणार नाहीत असं सांगीतलं.
दरम्यान अमीत शहा यांच्या पत्नी सोनल शहा यांनी शिर्डीला जाऊन साई समाधीच दर्शन घेतलं. अमीत शहांही हेलीकॉप्टरने शिर्डी विमानतळावर पोहचले आणि नंतर आपल्या पत्नीला घेऊन खाजगी विमानाने पुढे निघुन गेले. पावसाच्या फटक्या मुळे अकोले आणि राम शिंदेच्या मतदार संघातीलही अमीत शहा यांची आजची सभा रद्द झाल्याने अनेकांचा हिरमोड झालाय.