मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र ( Amit Shah maharashtra Tour ) दौऱ्यावर आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने अमित शाह यांच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. यानंतर ते प्रवरानगर ( Amit Shah visit Pravaranagar Loni in Ahmednagar ) इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) नियोजनावर जातीने लक्ष ठेवून आहेत. अमित शाह यांच्याकडे केंद्रीय सहकार मंत्रालयाची जबाबदारी दिल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्रात दौरा करणार आहेत. अमित शाह सहकार क्षेत्रासंदर्भात या परिषदेत काही महत्त्वाच्या घोषणा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
असा असेल दौरा -
- शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनानं शाहांचा दौरा सुरु
- सकाळी दर्शनासाठी मंदिरात दाखल होणार.
- त्यानंतर वाजता सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार.
दुसऱ्या दिवशी -
तर दुसऱ्या दिवशी ते पुणे शहराला भेट देतील. गृहमंत्री शाह थेट पुणे महापालिकेत येणार ( Amit Shah to visit Pune ) असून त्यांच्या शुभहस्ते महापालिकेतील हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण ( Dedication of statue Dr Babasaheb Ambedkar in pune ) होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पुणे महापालिकेच्या हिरवळीवर महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारक साकारण्यात येत आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात येत आहे. हे दोन्ही कार्यक्रम गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहेत असे मोहोळ म्हणाले. दोन्ही कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विशेष उपस्थित राहणार आहे.
देशातली पहिली सहकार परिषद -
अहमदनगरमधील प्रवरा इथे देशाची पहिली सहकार परिषद होत आहे. भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe) यांनी या सहकार परिषदेचं आयोजन केले आहे. सहकार क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावर याचा मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चा आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या परिषदेस केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह सहकारी साखर कारखाना, सहकारी बॅंक, सहकारी पतसंस्था क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर शाह मुंबईत ICSI राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभाला हजेरी लावतील.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दौरा -
आगामी महापालिका निवडणुकांच्या (PMC Elections) पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात होता. या दौऱ्याच्या निमित्ताने महापालिका निवडणुकांचा नारळ अमित शाह यांच्या हस्ते फोडला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.