शिर्डी(अहमदनगर) - साईबाबांच्या दर्शनासाठी(Shirdi Saibaba Darshan) आता शिर्डीत भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. साई संस्थानने ऑफलाइन पासेस(Offline Passes for Sai Darshan) देण्याची सुविधा सुरू केली आहे. आज गुरुवार असल्याने ऑफलाइन दर्शन पासेस(Offline Darshan Passes) घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत.
आता शिर्डीत आल्यानंतर भाविकांना थेट ऑफलाइन पद्धतीने पास देण्याची सुविधा साईबाबा संस्थानने बुधवारपासून सुरू केली आहे. यामुळे आता साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज गुरुवार असल्याने सकाळपासुन आतापर्यंत तब्बल 5 हजार भाविकांनी ऑफलाइन बायोमेट्रीक पासच्या माध्यमातून साई दर्शन घेतले आहे. या व्यतिरिक्त ऑनलाइन आणि व्हीव्हीआयपी ऑफलाइन दर्शन पासेसच्या माध्यमातून अनेंक भाविकांनी साई दर्शन घेतले आहे.
![shirdi sai darshan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-thursdaydaycrowd-18-vis-mh10010_18112021160215_1811f_1637231535_218.jpg)
- दिवसभरात 10 हजार भाविकांना मिळणार ऑफलाइन पास-
साईबाबा मंदिर 7 ऑक्टोबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, दर्शनासाठी येताना भाविकांना ऑनलाइन दर्शन पास घेऊन येण्याची सक्ती संस्थानकडून करण्यात आली होती. यामुळे अनेंक भाविकांना ऑनलाइन साई दर्शन पास कसा काढायचा याची माहिती नव्हती. तसेच विना पास शिर्डीत आल्यानंतर भाविकांना काही लोकं ऑनलाइन पास काढून देत जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी भाविकांनी आणि शिर्डी ग्रामस्थांनी साई संस्थानकडे केल्या होत्या. शिर्डीत आल्यानंतर भाविकांना थेट साई दर्शनाचा ऑफलाइन पास देण्यात यावा अशी मागणी भाविक आणि ग्रामस्थांकडून साई संस्थानला करण्यात आली होती. या मागणीकडे पाहता बुधवारपासून साई संस्थानने 10 हजार भाविकांना ऑफलाइन पद्धतीने पास देण्यास सुरुवात केली आहे.
![shirdi sai darshan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-thursdaydaycrowd-18-vis-mh10010_18112021160215_1811f_1637231535_690.jpg)
- दिवसभरात 25 हजार भाविकांना साई दर्शन -
या आधी दिवसभरात फक्त 15 हजार भाविकांना ऑनलाइन पासच्या माध्यमातून साई दर्शन दिले जात होते. आता शिर्डीत आल्यानंतर भाविकांना थेट सशुल्क आणि मोफत ऑफलाइन पद्धतीने 10 हजार पास देण्यास संस्थानने सुरुवात केली आहे. आता ऑनलाइन आणि ऑफलाइन असे दोन्ही मिळून दिवसभरात तब्बल 25 हजार भाविकांना साई दर्शन दिले जात आहे. त्यामुळे आज पुन्हा साईंची शिर्डी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे.
![shirdi sai darshan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-thursdaydaycrowd-18-vis-mh10010_18112021160215_1811f_1637231535_279.jpg)