शेवगाव(अहमदनगर)- शेवगाव पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळला होता. खबरदारीचा उपाय म्हणून शेवगाव उपकारागृहातील 30 कैद्यांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये सर्वच्या सर्व कैद्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पोलिस प्रशासन व कैद्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सध्या फक्त कारागृहातील कैद्यांच्या रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या असून गरज पडल्यास पोलीस कर्मचार्यांच्याही रॅपिड टेस्ट केल्या जातील, अशी माहिती तहसीलदार अर्चना पागिरे यांनी दिली.
गुरुवारी(30 जुलै) शेवगाव पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आला होता. यामुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली होती. तालुका प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणुन शेवगाव उपकारागृहात कैदेत असलेल्या एकूण 30 कैद्यांच्या शुक्रवारी रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. यापैकी सर्वांच्या टेस्टचे अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4973 वर पोहोचली आहे. यापैकी 3360 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 1545 रुग्णांवर उपचार सुरु असून 68 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी 10320 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. रुग्णांची एकूण संख्या आता 4 लाख 22 हजार 118 अशी झाली आहे. 7543 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण 2 लाख 56 हजार 158 रुग्ण बरे झाल्याने त्यांना दवाखान्यातून घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 50 हजार 662 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.